सामान्यांचे घराचे स्वप्न भंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:46+5:302021-06-19T04:22:46+5:30
अंबाजोगाई : राज्य शासनाने महसूल वाढविण्यासाठी गिट्टी, रेती, मुरुमाची रॉयल्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकामाच्या खर्चात दुप्पट वाढ ...
अंबाजोगाई : राज्य शासनाने महसूल वाढविण्यासाठी गिट्टी, रेती, मुरुमाची रॉयल्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकामाच्या खर्चात दुप्पट वाढ होणार आहे. परिणामी, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे अगोदरच सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यात बांधकाम साहित्यावरील रॉयल्टीत वाढ झाल्यास सर्वसामान्यांना घराचे बांधकाम साहित्य परवडणारे राहणार नाही. आता बांधकाम साहित्याच्या किमतीच वाढणार असल्याने बांधकामाच्या तयारीत असलेल्यांना धसका बसला आहे. सध्या घरकूल बांधकामाच्या दरात वाढ झाली असून जुलैमध्ये आणखीन वाढ होणार आहे.
राज्य शासनाने गिट्टी, रेती, मुरुमाची रॉयल्टी वाढविण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी जुलैपासून होणार आहे. बांधकाम साहित्यावरील रॉयल्टी वाढविल्यामुळे बांधकामाच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे सामान्यांना घराचे बांधकाम करताना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. रॉयल्टी वाढल्यामुळे खदान मालकांनाही फटका बसणार आहे.
राज्य शासनाने रॉयल्टीत वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आहे, तसेच अनेक घरकूल लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू झाले असून, त्यांना मंजूर झालेल्या अनुदानापेक्षा अधिक पैसा खर्च करावा लागणार असल्यामुळे त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अधुरे राहते की काय, अशी भीती आहे, अशी प्रतिक्रिया सुधाकर देशमुख यांनी दिली.
घरकूल लाभार्थ्यांची झाली पंचाईत...
घरकूल लाभार्थ्यांना सध्या मिळणाऱ्या अनुदानात सध्याच घराचे बांधकाम करणे कठीण आहे. त्यात शासनाने बांधकाम साहित्याच्या रॉयल्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढणार आहे. याशिवाय काही लाभार्थ्यांना घरकुलाचा निधीही मिळाला नसल्याने त्यांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा फटका लाभार्थ्यांना बसणार आहे.