शाळेचा अनधिकृत नळ ग्रामपंचायतने तोडला; विद्यार्थ्यांचे पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:05 PM2019-07-17T18:05:10+5:302019-07-17T18:11:16+5:30
अनधिकृत नळ जोडणी असल्याने ग्रामपंचायतने तोडले शाळेचे पाणी
माजलगाव (बीड ) : तालुक्यातील मंजरथ येथील गोदावरी विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याची जोडणी ग्रामपंचायतने अनधिकृत ठरवून तोडले आहे. विद्यार्थ्याना शाळेत पाणी पिळत नाही. यामुळे त्यांनी थेट पंचायत समितीसमोर पाण्यासाठी आर्त टाहो फोडला. शाळा प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात असलेल्या सुंदोपसुंदीत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होत असलेली हेळसांड आज (दि. १७ ) दुपारी चर्चेची ठरली.
एक महिन्यांपूर्वी येथील गोदावरी विद्यालयाची नळ जोडणी अनधिकृत ठरवून ग्रामपंचायतीने तोडले. त्यामुळे शाळेतील विध्यार्थ्यांची पाण्याअभावी चांगलीच हेळसांड सुरू आहे. मागील एक महिन्यापासून चाललेल्या या प्रकाराला अखेर बुधवारी तोंड फुटले. विद्यार्थी आणि पालकांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठत पिण्याच्या पाण्याच्या मागणी केली. यामुळे पंचायत समिती आवारात एकाच धांदल उडाली. सुमारे चार तास हा गोंधळ सुरू होता.
या वेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण , पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, उपसभापती डॉ. वसीम मनसबदार यांनी मानवीय दृष्टिकोनातून ग्रामपंचायत ने नळ सुरू करून देऊन कागदोपत्री पूर्तता करून घ्यावी अशी मध्यस्थी केली. मात्र, सरपंच श्रतुता आनंदगावकर यांनी अधिकृत मागणी झाल्याशिवाय नळ सुरू करण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली. शेवटी गटविकास अधिकारी चव्हाण यांनी ग्रामसेवकास नळ कनेक्शन सुरू करून कागदपत्रांची रीतसर पूर्तता करून घेण्याचा आदेश दिला.
अधिकृत मागणी फेटाळली
नळ जोडणी तोडल्यामुळे मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांची पाण्यासाठी हेळसांड होत आहे. नळ जोडणीचे रीतसर दिलेले पत्र ग्रामपंचायतने फेटाळले.
- आर.डी. काकडे -- मुख्याध्यापक
रीतसर जोडणी घ्यावी
तीन महिन्यांपूर्वी शाळेला अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करून घेण्याची नोटीस दिली होती. मात्र, शाळेने याची पूर्तता केली नसल्याने नळ जोडणी तोडली. शाळेने रीतसर अर्ज केल्यास नळ जोडणी देण्यात येईल.
- ऋतुजा आनंदगावकर, सरपंच
ग्रामपंचायत कायम चर्चेत
सरपंच ऋतुजा आनंदगावकर या बाहेर गावी एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहेत. त्या गावात कमी राहत असल्याने वडील राजेंद्र आनंदगावकर हेच काम पाहतात. सरपंच नसल्याने प्रत्येक कामात त्यांच्या नातेवाईकांकडून होत असलेली मनमानी वादास कारणीभूत ठरत असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. तर सरपंच या अभियंता व त्यांचे पालक उच्चशिक्षित आहेत. यामुळे कोणतेही काम नियमानुसारच होईल असा त्यांचा आग्रह असतो.
विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होत असलेली हेळसांड पाहता मानवीय दृष्टीकोनातुन संबंधित ग्रामसेवकास तात्काळ नळ जोडून देऊन आगामी काळात कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- बी. टी. चव्हाण, गटविकास अधिकारी