वाहने सावकाश चालवा ; पुढे मोकाट जनावरे आहेत....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:18+5:302021-09-22T04:37:18+5:30
बीड : शहरात सध्या मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात जनावरांची संख्या अधिक दिसते. हे ...
बीड : शहरात सध्या मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात जनावरांची संख्या अधिक दिसते. हे जनावरे रस्त्यावरच ठिय्या मांडत असल्याने वाहतुकीसह अडथळा निर्माण होत आहे. पालिका मात्र, केवळ बघ्याची भूमिका घेत असून बंदोबस्त करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. कोंडवाडे ही केवळ नावालाच असल्याचे दिसते.
शहरात खासबाग परिसरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडा आहे. परंतु याचे कुलूप मागील अनेक वर्षांपासून उघडलेले नाही. त्यामुळे शहरात मोकाट गुरे वाढले आहेत. या जनावरांचा केवळ वाहनांनाच अडथळा होत नसून पादचाऱ्यांनाही त्रास होत आहे. तसेच गल्लीबोळात हे जनावरे फिरकत असल्याने महिला, लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी या जनावरांनी शिंग मारल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हे सर्व वास्तव पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिसत असतानाही काहीच कारवाई केली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या मार्गावर वाहने सावकाश चालवा
बीड शहरातील नगर रोड, जालना रोड, बार्शी रोड, सुभाष रोड, माळीवेस, भाजी मंडई, बशिरगंज चौक, कंकालेश्वर मार्ग, मोंढा रोड, डीपी रोड या मार्गावर सार्वाधिक मोकाट जनावरांची संख्या असल्याचे दिसते. त्यामुळे येथून जाताना वाहने थोडे सावकाश चालविण्याची गरज आहे.
--
मोकाट जनावरांचा वाली कोण?
बीड शहरात जे मोकाट जनावरे आहेत, त्यांचा वाली कोण? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण दिवसरात्र हे जनावरे रस्त्यावरच असतात. पालिकेच्या म्हणण्यानुसार हे जनावरे काही लोकांच्या मालकीचे आहेत. हे माहीत असतानाही कारवाई का केली जात नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.
---
शहरात दोन कोंडवाडे आहेत. कारवाया आणि इतर माहिती आपल्याला स्वच्छता निरीक्षक जाधव देतील. मला याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही. कारण याची रिपोर्टिंग माझ्याकडे नसते.
युवराज कदम, कार्यालयीन अधीक्षक न. प. बीड