जीपमध्येच चालकाचा खून, वाघाळा शिवारात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:58 PM2019-12-10T23:58:56+5:302019-12-11T00:00:29+5:30
तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर वाघाळा शिवारात एका जीपमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली.
परळी : तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर वाघाळा शिवारात एका जीपमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली.
विजय सखाराम यमगर (वय ३० रा. दगडवाडी ता.परळी) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या बाबत मिळालेली माहिती अशी आहे की, विजय यमगर हे स्वत:चे वाहन किरायाने चालवतात. सोमवारी जीप (क्र.एमएच २४ व्ही ५१४८)घेऊन ते अंबाजोगाईला गेले होते. रात्री तेथून परळीला भाडे घेऊन जाणार होते. मात्र, मंगळवारी सकाळी कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर वाघाळा शिवारात त्यांच्याच जीपमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मानेवर आणि डोक्याजवळ तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून येत होते. ही जीप सोमवारी रात्रीपासून या ठिकाणी उभी होती. दरम्यान सकाळी नागरिकांनी गाडीत डोकावून पाहिले असता आतमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. चारचाकीमध्ये कोणीही नसताना आतमध्ये मृतदेह पाहून परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी याची माहिती प्रथम सिरसाळा पोलीस ठाण्यास दिल्याने पोनि श्रीकांत डोंगरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर संबंधित पोलीस ठाणे व वरिष्ठांना या घटनेची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पाहणी करुन पंचनामा करण्यात आला. परळी उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. मयत विजय यांचे भाऊ नरेश सखाराम यमगर यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय यमगर यांचा खून का झाला याचे कारण तपासानंतरच पुढे येणार आहे.
पोनि प्रदीप त्रिभुवन हे तपास करत आहेत. विजय यमगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. या घटनेचे धागेदोरे हाती लागतात का? यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
अर्ध्या तासात येतो, असे म्हणाले होते विजय
सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास विजय हे त्यांची किरायाची गाडी घेऊन जाणार होते. फिर्यादीत नमुद केल्याप्रमाणे भाऊ नरेश यांचे फोनवरून बोलणे झाले होते. यावेळी आपण परळीवरुन पेशंट आणण्यासाठी जात असल्याचे विजय यांनी सांगितले होते. लवकर ये उद्या पण भाडे आहे असे सांगितले होते.
दरम्यान शेवटचा फोन झाला त्यावेळी दवाखान्याबाहेर आहे अर्ध्या तासात पोहचतो असे विजय म्हणाले होते. त्यानंतर उशीरापर्यंत फोन लावला परंतु फोन बंद होता. रात्रभर फोन करुन देखील फोन लागला नाही. सकाळी थेट सिरसाळा पोलीस ठाण्यातून खून झाल्याचा फोन आला.
तपास पथके रवाना
खूनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, परळी ग्रामीण ठाण्याचे पोनि प्रदीप त्रिभूवन व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरोडा प्रतिबंधक पथक प्रमुख गजानन जाधव यांच्या पथकानेही परळी ग्रामीण हद्दीत भेट देत तपासचक्रे फिरविली आहेत.