चालक पोलीस भरती: ३६ जागांसाठी २१४४ उमेदवारांनी दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:38 AM2021-09-23T04:38:22+5:302021-09-23T04:38:22+5:30
बीड: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाईपदाच्या ३६ जागांसाठी २२ सप्टेंबर रोजी १० केंद्रांवर लेखी परीक्षा शांततेत पार ...
बीड: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाईपदाच्या ३६ जागांसाठी २२ सप्टेंबर रोजी १० केंद्रांवर लेखी परीक्षा शांततेत पार पडली. ३४४२ पैकी २१४४ उमेदवारांनी परीक्षा दिली तर तब्बल १२९८ जण गैरहजर राहिले.
चालक पोलीस शिपाई पदासाठी २०१९ मध्ये भरती जाहीर झाली होती.कोरोनामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. २२ सप्टेंबर रोजी दहा केंद्रांवर लेखी परीक्षा झाली. सकाळी ११ ते दुपारी साडेबारा या दरम्यान १०० गुणांची परीक्षा सुरळीत पार पडली. कोरोनामुळे मास्क, सॅनिटायझर अनिवार्य केले होते. दरम्यान, ठिकठिकाणच्या केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची यादी दोन दिवसांत जाहीर होईल. त्यानंतर शारीरिक पात्रता तपासण्यापूर्वी मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, विविध केंद्रांवर पोलीस अधीक्षक आर.राजा , अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके,केजचे उपअधीक्षक आयपीएस पंकज कुमावत यांनी भेटी दिल्या. प्रभारी उपअधीक्षक (गृह) उमेश कस्तुरे व सहायक निरीक्षक आनंद कांगुणे यांनी समन्वयाची भूमिका पार पाडली.
.....
१२९८ जणांची पाठ
दरम्यान, परीक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास आधीच केंद्रावर पोहोचणे उमेदवारांना बंधनकारक केले होते. मात्र, काही उमेदवार उशिरा पोहोचले. त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला गेला. सुमारे १२९८ उमेदवारांनी परीक्षेस दांडी मारली.
....