वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला, भागवयाचे कसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:25+5:302021-05-28T04:25:25+5:30
बीड : कोरोनाचा संसर्ग, लॉकडाऊनचे दुष्परिणाम समाजातील वेगवेगळ्या घटकांवर एवढ्या खालपर्यंत जाऊन पोहोचले आहेत की, येणाऱ्या काळात ते सहजासहजी ...
बीड : कोरोनाचा संसर्ग, लॉकडाऊनचे दुष्परिणाम समाजातील वेगवेगळ्या घटकांवर एवढ्या खालपर्यंत जाऊन पोहोचले आहेत की, येणाऱ्या काळात ते सहजासहजी भरून निघण्याची शक्यता कमी आहे. नागरिकांना दुचाकी, चारीचाकी वाहन वापरणे आता खर्चीक बाब ठरत आहे. संचारबंदीमुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्याची परिस्थिती आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे बीड जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. हा संसर्ग मधल्या काळात कमीदेखील झाला होता. मात्र, पूर्णपणे कोरोनाची दुसरी लाट पुन्हा जिल्ह्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली. या काळात अनेक निर्बंध लादण्यात आले होते. विशेषत: विनाकारण प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. मागील तीन महिन्यांपासून अनेकांचा हातचा रोजगार बंद झाला आहे. तर, उद्योगधंदे बंद झाल्यामुळे उत्पन्नदेखील कमी झाले आहे. त्यातच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची देखभाल करणे कठीण होत आहे. अनेक नागरिकांनी अतिआवश्यक असेल तर, वाहने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. हीच परिस्थिती गॅरेज चालकांचीदेखील आहे. सर्वकाही बंद असल्यामुळे त्यांचा धंदादेखील मंदावला असून, वाहनांवर अवलंबून असलेल्या सर्वच आस्थापनांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे भाड्याने गाडी चालवणाऱ्यांनीदेखील दर वाढविले आहेत. त्यामुळे नागिरकांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे अनेकांनी वाहन वापर कमी केला असून हेच चित्र लॉकडाऊननंतर देखील दिसण्याची शक्यता आहे.
गॅरेजवाल्यांचे पोटपाणी बंद
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गॅरेज चालकांना सर्वाधिक फटका बसला होता. दुसऱ्या लाटेतदेखील तीच परिस्थिती आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे तर, ॲाटोमोबाईल सेक्टरमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केलेले स्पेअरपार्टचे व्यापारीदेखील संकटांत सापडले आहेत.
वचिष्ट मस्के, मॅकेनिक
गॅरेजचालकांना व ॲाटोमोबाईल सेक्टरला शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. मागील वर्षभरापासून हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. त्याला आधार मिळाला नाही. तिसरी लाट आली तर, गॅरेज व स्पेअरपार्ट विक्रेते देशोधडीला लागतील. त्यामुळे शासनस्तरावरून मदत करावी, अशी आमची मागणी आहे.
वाहने सुरू, पण गॅरेज बंद
दुचाकी, चारचाकी वाहन प्रत्येक नागरिकांसाठी आज आवश्यक झाले आहे. अनेकदा तर, वाहन नसेल तर कामे खोळंबतात. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील किंवा अत्यावश्यक असेल तर, वाहने चालवावी लागत आहेत. मात्र, वाहनांमध्ये बिघाड झाल्यास गॅरेजसाठी भटकंती करावी लागत आहे. तर अनेकांना मॅकेनिकला घटनास्थळावर बोलवावे लागत आहे.
वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर
सध्याच्या परिस्थितीत दुचाकी चारचाकी वाहनधरकांसमोर अडचणीचा डोंगर आहे. प्रवासी वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधरकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आलेली आहे. ही परिस्थिती लवकर सुधारणे गरजेचे आहे.
वाहने पार्किंगमध्येच
मागील वर्षापासून वाहनांचा वापर अत्यंत कमी झाला आहे. संचारबंदीवर निर्बंध असल्यामुळे भाडे मिळत नाहीत. भाडे मिळत नसल्यामुळे गाडीचा हप्ता भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी.
अशोक जगताप
समाजातील प्रत्येकजण या काळात अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोत आणि खर्च यात चारचाकीला महत्त्व देऊन चालणार नाही. त्यामुळे अनेकांनी गाडीचा वापर कमी केला आहे.
सुनील खंडागळे
जिल्ह्यातील वाहनांची संख्या
कार २,६५,०००
जीप, रुग्णवाहिका १,६७,०००
दुचाकी १४,८७,०००
रिक्षा ४२,०००
मालवाहू वाहने ४५,०००