चालकाच्या डुलकीने कार-दुचाकीला धडकली;एअरबॅगने कारमधले बचावले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 03:56 PM2024-12-09T15:56:16+5:302024-12-09T15:56:49+5:30

केज-कळंब महामार्गावरील घटना; कारच्या धडकेनंतर दुचाकी वीस फूट फरफटत गेली, तर कार रस्त्याच्या बाजूला पंधरा फूट खड्ड्यात पडली

Driver's nap hits car-bike; Airbags save car passenger, biker dies | चालकाच्या डुलकीने कार-दुचाकीला धडकली;एअरबॅगने कारमधले बचावले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

चालकाच्या डुलकीने कार-दुचाकीला धडकली;एअरबॅगने कारमधले बचावले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

केज : केज-कळंब महामार्गावर माळेगाव शिवारात कारने दुचाकीला समोरून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण ठार झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास माळेगाव शिवारात घडली.

माळेगाव येथील अशोक मारुती चिरके (वय २५) व वनिता धर्मराज गायकवाड (वय ५०) (दोघेही रा. सुकळी) हे दुचाकीवरून (एमएच ०५, एई ११९२) शेतातील कामे उरकून घराकडे जात होते. त्याचवेळी केजकडून कळंबकडे जाणाऱ्या कारने (एमएच २३, बीसी ६३८३) माळेगाव शिवारात दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील अशोक चिरके याच्या कमरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली, तर मागे बसलेल्या वनिता गायकवाड यादेखील गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर माळेगाव येथील तरुणांनी जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, जखमी अशोक चिरके याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या अपघातात दुचाकी व चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह भेट दिली.

चालकाला डुलकी, एअरबॅगमुळे पाच जण बचावले
कार चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले. कारच्या धडकेनंतर दुचाकी वीस फूट फरफटत गेली तर अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजूला पंधरा फूट खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी एअर बॅग उघडल्याने कारमधील दोन महिला व दोन पुरुष आणि लहान मुलगा बालंबाल बचावले.

Web Title: Driver's nap hits car-bike; Airbags save car passenger, biker dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.