Droght In Marathwada : पावसाअभावी पिके गेली, गाव सोडायची वेळ आली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 06:49 PM2018-10-22T18:49:39+5:302018-10-22T18:49:39+5:30

दुष्काळवाडा :  शासनाने पाण्याची सोय न केल्यास काही दिवसांत ग्रामस्थांना पाण्यासाठी गाव सोडावे लागणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केकतसारणीला भेट दिली तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली.  

Droghut In Marathwada: Crops have been lost due to the lack of rain, the time has come to leave the village! | Droght In Marathwada : पावसाअभावी पिके गेली, गाव सोडायची वेळ आली !

Droght In Marathwada : पावसाअभावी पिके गेली, गाव सोडायची वेळ आली !

googlenewsNext

- दीपक नाईकवाडे, केकतसारणी, ता. केज, जि. बीड 

खरिपात पावसाने पाठ फिरविल्याने थोड्या फार प्रमाणात झालेल्या पहिल्या पावसानंतर पाऊस पडेल या आशेवर पेरणी करून कापसाची लागवड केली. मात्र पावसाळा संपला तरीही पाऊस आलाच नाही. शेतातील पिकांनी माना टाकल्या. कापूस वाळून गेला. हे कमी म्हणून की काय त्यातच गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला. गावातील दोन बोअरवेल दिवसातून दोन तास कसे बसे चालत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दिवस-रात्र एक करण्याची वेळ आली आहे. शासनाने पाण्याची सोय न केल्यास काही दिवसांत ग्रामस्थांना पाण्यासाठी गाव सोडावे लागणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केकतसारणीला भेट दिली तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली.  

खरीप हंगामाच्या सुरु वातीला रिमझिम बरसल्यानंतर पाऊस पडेल या आशेवर केकतसारणीतील शेतकऱ्यांनी ५९५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, मका, तुरीसह अन्य पिकांची पेरणी केली तर कापसाची लागवड केली. पिकांनी माना वर काढल्या, मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके शेतातच करपून वाळून गेली. सोयाबीनच्या नुसत्या काड्या शेतात दिसू लागल्या. वाळून गेलेल्या कापसाच्या पळाट्या शेतात उभ्या असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पशुसंवर्धन कसे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतातील पिके वाळून गेल्याने शेतात काहीच काम नसल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने शेतीकामावर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

पावसाअभावी शेती नापिकी झालेली असतानाच गावात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन बोअरवेल आहेत. या बोअरवेलमध्ये विद्युतपंप टाकून पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येते. यापैकी एका बोअरवेलची विद्युत मोटर पंधरा दिवसांपूर्वी जळाल्याने गावातील एकाच बोअरवेलवर गावचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तेथे थेंब थेंब पडणारे पाणी घागरीत भरण्यासाठी महिलांना प्रतीक्षा करावी लागते. पाणी आणण्यातच दिवस जात आहे. 

परिसरातही स्थिती सारखीच
केकतसारणी गावच्या परिसरातील आडस, मानेवाडी, चंदनसावरगाव, उंदरी या गावातही अशीच बिकट परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाळा आत्ता कुठे सं्ला असून पुढील अख्खे वर्ष कसे काढायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. 

- ६८१ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य 
- २२. २२ या वर्षीची पैसेवारी 
- ३४०.०० मिमी - २०१४ मधील पाऊस 
- ३१४. १४ मिमी - २०१५ मधील पाऊस 
- ८७६.७१ मिमी - २०१६ मधील पाऊस 
- ८२१. ७१ मिमी - २०१७ मधील पाऊस 
- ४०३ .०० मिमी - २०१८ मधील पाऊस   

उत्पादनात घट होणार 
२५ टक्केच्या आसपास पिकांचे उत्पन्न हाती येण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोयाबीन, उडीद यांच्या उत्पादनात घट झाली असून, कापसाला पाच दहा बोंडे असल्याने कापसाचे उत्पादन घटणार आहे. तुरीची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे.    
- चंद्रकांत देशमाने, तालुका कृषी अधिकारी, केज 

बळीराजा काय म्हणतो?

- पाऊस न पडल्याने शेतातील पिके गेली. गावातील दोनपैकी एकच बोअर चालू असून तो एक तास गुळण्या टाकत चालतो. अशी बिकट वेळ याअगोदर आली नव्हती. त्यामुळे पाण्यासाठी गाव उठून जाईल असंच वाटतंय. -कलावती रूपनर, माजी सरपंच 

- दोन एकर जमीन असून यावर्षी चांगला भाव मिळेल या आशेने शेतात कापूस लावला. पावसाअभावी तो उपटून टाकायची वेळ आली आहे. हाताला काम मिळत नसल्याने घरात आहे ते खाऊन दिवस काढण्याची वेळ आली आहे. - उत्तरेश्वर काळे 

-  पाऊण एकर शेतात सोयाबीन व कापसाची लागवड केली; मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतात वाळून गेलेला कापूस, सोयाबीन उपटून फेकावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दिवस-रात्र बोअरजवळ बसावे लागते. - जीवन निवृत्ती शिंदे 

- पंचमीला एकदा भुरभुर झाली. पेरणी केली. मात्र पुन्हा पाऊस पडलाच नसल्याने शेतातील पिके फुलक्यातच वाळून गेली. आता जनावरे कशी जगवायची हाच प्रश्न पडला आहे. - धनराज लक्ष्मण दहीफळे 

Web Title: Droghut In Marathwada: Crops have been lost due to the lack of rain, the time has come to leave the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.