अवकाळीने हिरावला हातातोंडाशी आलेला घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:41 AM2019-04-09T00:41:52+5:302019-04-09T00:42:10+5:30
केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. मात्र, तरी देखील आहे त्या पाण्यावार नियोजन करुन अनेक शेतकऱ्यांनी केळी, आंबा व इतर फळबागा लावल्या अन् जोपासल्या आहेत. मात्र, केळी व आंबा ऐन बहरात असताना मगील आठवड्यात गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह गारपीटमध्ये केळीची झाडे कोलमडून जमीनदोस्त झाली तर आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला होता. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात साधारण २ हजार ते २५०० हेक्टर क्षेत्रावर केळी तर जवळपास ३ हजार हेक्टरवर आंबा फळबाग लागवड करण्यात आली आहे. शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील आहे त्या पाण्याचे नियोजन करुन या फळबागा वाढवल्या आहेत. त्यांना यामध्ये चांगले यश देखील आले होते.
अनेक ठिकाणी केळीचे पीक चांगल्या स्थितीमध्ये होते. तसेच बागांची विक्री देखील सुरु होती. त्याचसोबत आंबे देखील मोठ्या प्रमाणात आले होते त्यांची देखील व्यापा-यांकडून पाहणी करुन विक्री केली जाणार होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या गारपिटीमध्ये केळी व आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच शेतक-यांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत व शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.