बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर
By शिरीष शिंदे | Published: October 2, 2023 06:22 PM2023-10-02T18:22:14+5:302023-10-02T18:22:41+5:30
पावसाने पाठ फिरविल्याने पिकांना बसला फटका
बीड : महसूल विभागाने हंगामी पैसेवारी जाहीर केली असून पावसाने पाठ फिरविल्याचा फटका पिकांना बसला असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याची खरीप हंगामी पैसेवारी ४८.०७ जाहीर केली आहे. या पैसेवारीवरून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मानले जात आहे.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पूर्वी पैसेवारीचा आधार घेतला जात असे. परंतु आता वेगवेगळे निकष ग्राह्य धरून दुष्काळ जाहीर केला जातो. त्यात माती आर्द्रता, पीक कापणी प्रयोग, पाणी पातळी यासह इतर बाबींचा समावेश आहे. असे असले तरी पैसेवारी महत्त्वाची मानली जाते. महसूल विभागाने ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले असून सरासरी पैसेवारी ही ४८.०७ एवढी जाहीर करण्यात आली आहे. तालुकानिहाय आकडेवारीचे अवलोकन केले तर गेवराई तालुक्याची पैसेवारी ५४.१९ असल्याचे दिसून येते. त्यामुळे गेवराई तालुक्यातील पिकांचे नुकसान अधिक असल्याचे दिसून येत आहे.
१४०३ गावांचा समावेश
पैसेवारी काढण्यासाठी बीड जिल्ह्यातील १४०३ गावांचा समावेश करण्यात आला होता. पैसेवारी काढण्यासाठी पाहणी केलेले हेक्टर उत्पादन, प्रमाण उत्पादन पाहिले जाते. प्रत्येक प्रमुख पिकांचे किमान ६ कापणी प्रयोग घेण्यात येतात. पीक कापणी प्रयोगासाठी शेत निवडण्यासाठी कृषी विभागाची मदत घेतली जाते. पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर पिकांच्या पेरणी क्षेत्राचे प्रमाण व कापणी प्रयोगाअंती आलेली पैसेवारी यांची भारांकित सरासरी काढली जाते. त्यानुसार महसूल गावाची पैसेवारी काढली जाते.
कृषी विभागाने पूर्वीच वर्तविला होता अंदाज
जिल्ह्यात पावसाने दडी मारली असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून पिकांची वाढ पावसाअभावी खुंटलेली आहे. परिणामी पीक परिस्थिती चिंताजनक आहे. एक महिन्यापेक्षा जास्त पावसाचा खंड असल्याने उत्पादकतेत ५० टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच वर्तवली होती. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख ८२ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.५६ टक्के आहे. सद्यस्थितीला सोयाबीनवर पिवळा मोझॅक हा रोग पसरला असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
अशी आहे तालुक्यांची पैसेवारी
बीड-४६.००
आष्टी-४६.००
पाटोदा-४६.५९
वडवणी-४८.४०
शिरुर-५०.७९
गेवराई-५४.१९
अंबाजोगाई-४८.००
केज-४७.३७
माजलगाव-४८.५७
धारुर-४५.०३
परळी-४७.८३
एकूण- ४८.०७