Drought In Marathwada : लहरी निसर्गामुळे मांजराकाठची सुपीक शेती उद्ध्वस्त झाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 02:37 PM2018-10-12T14:37:16+5:302018-10-12T14:39:39+5:30
दुष्काळवाडा : पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाटोद्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव घुमरा येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता ही दाहकता समोर आली.
- विलास भोसले, पारगाव घुमरा, ता. पाटोदा, जि. बीड.
पेरले की पीक पदरात पडणारच असा इतिहास असलेली मांजरा नदीकाठची सुपीक काळ्या मातीची जमीन निसर्गाच्या अवकृपेमुळे उद्ध्वस्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबरमध्ये पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आभाळ कोसळल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली. या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसावर २०१७ मध्ये बोंडअळीने हल्ला चढवला. पुढच्या हंगामात तरी कसर भरून निघेल या आशेवर असताना मेघराजाने डोळे वटारल्यामुळे हा बळीराजा पुरता होरपळून निघाला आहे. पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाटोद्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव घुमरा येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता ही दाहकता समोर आली.
कायम दुष्काळी अशी ओळख असलेले पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा हे गाव. मांजरा नदीकाठी असल्याने जमिनी सुपीक आहेत. एका पावसावर पेरणी केली तरी हमखास पिके पदरात पडणार असा या गावचा इतिहास. मात्र मांजरा नदीवर महासांगवी येथे सिंचन प्रकल्प झाला आणि नदीचे वाहणे बंद झाले. दोन वर्षांपूर्वीची अतिवृष्टी वगळता मागील अनेक वर्षांत नदी वाहिलीच नाही, असे या भागातील शेतकरी सांगतात.
गावातील शेतीउद्योग कोलमडून पडलाय. मात्र शेती कसल्याशिवाय पर्याय नसल्याने दिवस काढण्याचे काम सध्या शेतकरी करत आहेत. सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांकडे कल असून यंदा तर निसर्गाच्या लहरीपणाने चांगलेच फटकारले. खरिपाची ही अवस्था झाली असून पाऊस नसल्याने रबीचा हंगामही धोक्यात आला आहे. शेतीच पिकत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत आले आहेत. जनावरांचा चारा, पाण्यासह मजुरीचा प्रश्न गंभीर आहे. साखर कारखान्यावर जाण्याचा कल वाढला आहे. वर्ष कसे काढायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
पारगाव घुमरा
एकूण क्षेत्र -२३७६ हेक्टर
बागायती क्षेत्र - ९० हेक्टर
हंगामी बागायत -४७० हेक्टर
जिरायती क्षेत्र - १८०० हेक्टर
खरीप २०१८ पीकपेरा
कापूस - ७७५ हेक्टर सोयाबीन - ८४० हेक्टर
उडीद - २१० हेक्टर मुग -१५० हेक्टर
इतर - ६० हेक्टर लोकसंख्या - ३५००
पावसाची सरासरी
६७८ मिमी - तालुक्यात सरासरी पाऊस पडतो
३८० मिमी - २०१५
१०२९ मिमी - २०१६ शेवटच्या टप्प्यात जोरदार पाऊस
९३५ मिमी - २०१७
३१४ मिमी - २०१८
पाटोदा तालुक्यात सर्वच पिके वाया
पाटोदा तालुक्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र ४४ हजार २६९ हेक्टर एवढे आहे. यंदा सुरुवातीस पेरणीयोग्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पेरा झाला. विशेष म्हणजे पाच हजार हेक्टर जादा पेरा झाला. कपाशीवरील बोंडअळी हल्ल्यामुळे सोयाबीनचा पेरा वाढला. चार महिन्यांच्या काळात पावसाने मोठी हुलकावणी दिल्याने बहुतेक सर्वच पिके वाया गेली आहेत.
परिस्थिती कठीण
उडीद आणि मुगाचा उतारा १५ ते २५ टक्के आहे. सोयाबीन पिककापणी अहवाल तयार होत आहे. कापूस गेल्यात जमा आहे. ढोबळमानाने सरासरी उत्पन्न २५ टक्क्यांपर्यंत जाईल. परिस्थिती कठीण आहे.
- वसंत बिनवडे, तालुका कृषी अधिकारी, पाटोदा.
बळीराजा काय म्हणतो?
- मुबलक पाणी, वीज आणि स्वस्त खतं बियाणे मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज होणार नाही. लहरी निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. - शहादेव माने
- करपलेली पिकं बघून पिळवटून जातंय. ७२ च्या दुष्काळात पाणी होतं, धान्य नव्हतं. आता अवघड गणित आहे. - लिंबराज किसन कोकाटे
- तीन -चार वर्षांपासून कर्ज काढून पेरणी करतोय. दरवर्षी काहीतरी संकट येत आहे. आता धीर सुटायला लागलाय. शाळेत जाणारी पोरं, घर-प्रपंच चालवून कर्ज कसे फेडावे हाच पेच आहे. - सुरेश बाबूराव वारभुवन