Drought In Marathwada : खरिपात होरपळलो, रबीचे कसे होईल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 06:30 PM2018-10-08T18:30:10+5:302018-10-08T18:32:52+5:30
दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे.
- विजयकुमार गाडेकर, झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड
दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे. खरिपाचा हंगाम खर्च करून हात मोकळे करून गेला. जलाशये कोरडे असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ३८ % पाऊस शिरूर तालुक्यात झाला आहे. तालुक्यात महसुली गावांची संख्या ७४ असून, तीनही मंडळांत स्थिती सारखीच आहे. शासनाने संपूर्ण शिरूर तालुक्याची खरीप हंगामातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केली आहे. आता चारा, पाण्याच्या प्रश्नामुळे पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न आहे. त्रासून सोडणारी ही विदारकता ‘लोकमत’ प्रतिनिधीने झापेवाडी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली असता निदर्शनास आली.
शिरूरच्या पूर्वेला तीन कि.मी. अंतरावर असलेल्या या गावातील जमीन मध्यम व हलक्या स्वरूपाची; परंतु कष्टाच्या बळावर शेतात राबणारे हे गाव. जवळपास निम्मे लोक ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. यावर्षी तर पाऊसच नसल्याने पिकांची वाताहात झाली. ऊसतोडीला न जाणारेदेखील यंदा जाण्याच्या तयारीत आहेत. उचल नसली तरी चालेल; पण आम्हाला येऊ द्या, असा आग्रह धरत असल्याचे ऊसतोड मुकादम सीताराम पवार यांनी सांगितले.
येथील शेतकरी पांढऱ्या सोन्याला भाळला. मात्र, लाल्या आणि बोंडअळीने कापसाची नव्हे शेतकऱ्यांची चांगलीच जिरवली. तूर, मूग घुगऱ्या खाण्याइतपतही झाला नाही. उडीद ,भुईमूग, तीळ, सोयाबीन, कारळाची पिके केव्हाच हातातून निसटली. खरीप हंगाम आला तसा गेला. जाताना मात्र खर्ची घेऊन गेला. आता रबीचे काय? हा प्रश्न भेडसावत आहे. महिनाभरा इतकाच वाळलेला चारा आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी ऊस वापरण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. शिरूर तालुक्यात २०१४ मध्ये ३६३ मि.मी., २०१५ मध्ये २७३, २०१६ मध्ये ६३३, २०१७ मध्ये ५९१, २०१८ मध्ये ४ आॅक्टोबरपर्यंत २२८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिरूर तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ५९९.४ मि.मी. इतकी आहे. यंदा केवळ २२९ मि.मी. पाऊस झाला आहे.
बळीराजा काय म्हणतो?
मला अवघी दीड एकर जमीन आहे. त्यात घेतलेले पीक शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे कसे होणार हाच विचार भंडावून सोडत आहे.
-विठ्ठल विश्वनात राऊत
माझ्याकडे चार एकर शेती आहे. चार मोठी जनावरे, पाच शेळ्या असा प्रपंच. आता मात्र हे सर्व बिºहाड ऊसतोडीसाठी गेल्याशिवाय भागणार नाही.
-अभिमान एकनाथ मोरे
मी अशी वेळ कधी पाहिली नव्हती. दुष्काळ पाहिले; परंतु पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवले नव्हते.
-आश्रुबा रावजी राऊत
आमचे अकरा माणसांचे कुटुंब. पंधरा-सोळा एकर जमिनीत जवळपास सव्वालाख रुपये खर्च केले; परंतु यावर्षी आमच्यावर ऊसतोडीला जाण्याची वेळ आली आहे.
-संगीता कृष्णाथ गंडाळ
यावर्षी दुहेरी फटका बसल्याने हवालदिल झालो आहोत. आता सरकारनेच दिलासा द्यावा.
-बापूराव मोरे
रबी हंगाम पावसावरच
पाऊस कमी झाल्याने खरीप हंगामात स्थिती बिकट झाली आहे. रबी हंगाम पावसावरच अवलंबून आहे. फळबागेबाबत शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानआधारित फळपीक विमा काढून आपली बाग विमा संरक्षित
करावी.
-भीमराव बांगर, तालुका कृषी अधिकारी, शिरूर कासार