Drought In Marathwada : गोदाकाठी असलेली समृद्धी यंदाच्या दुष्काळाने हिरावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 07:44 PM2018-10-15T19:44:23+5:302018-10-15T19:44:52+5:30

दुष्काळवाडा : परळी तालुक्यातील आदर्श सांसद गाव असलेल्या पोहनेर आणि लगतच्या रामेवाडी कासारवाडी शिवारातील शेतकऱ्यांची व्यथा.

Drought In Marathwada: richness of Godavari basin is spoiled by drought | Drought In Marathwada : गोदाकाठी असलेली समृद्धी यंदाच्या दुष्काळाने हिरावली

Drought In Marathwada : गोदाकाठी असलेली समृद्धी यंदाच्या दुष्काळाने हिरावली

googlenewsNext

- संजय खाकरे, पोहनेर, ता. परळी, जि. बीड

गोदामाईने आतापर्यंत भरपूर दिले; पण निसर्गाच्या अवकृपेमुळे सारेच संपले. पाऊसच नसल्याने खरिपाची पिके कोमेजली. सोयाबीनचे उत्पन्न घटले. वाती इतकाच कापूस बोंडाला लागल्याने पुरती वाट लागली. दसरा, दिवाळीचा सण तोंडावर आहे. आता खायचे काय आणि जगायचे कसे, हीच चिंता आहे. परळी तालुक्यातील आदर्श सांसद गाव असलेल्या पोहनेर आणि लगतच्या रामेवाडी कासारवाडी शिवारातील शेतकऱ्यांची व्यथा. पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने या परिसराला भेट दिली असता दुष्काळाची भीषणता जाणवली. 

परळीपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेले पोहनेर, रामेवाडी, कासारवाडी शिवार हे सिरसाळा महसूल मंडळात येते. या भागातील जमीन भारी स्वरूपाची आहे. केवळ पावसाने साथ न दिल्याने खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गंगथडीची जमीन असल्याने या भागात ज्वारीचे उत्पादन दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे रबीचा पेरा होणार नाही. ज्वारीही पेरता आली नाही. सोयाबीनची पेरणी केली; पण शेंगा भरल्याच नाहीत. आले ते पीक करपलेले आहे. कापूस वाळला असून उत्पादन ५ टक्केसुद्धा हेणार नाही. हुमणी अळीने पोखरल्याने उभा ऊस जमीनदोस्त झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे हातपंपही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. पोहनेरला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. रामेवाडी, कासारवाडीत तर ठणठणाट आहे.  उन्हाळा आणखी बारच दूर असताना ही स्थिती आहे. 

- १०७ - तालुक्यातील गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी 
- ७२७.६ मिमी तालुक्याचे पंचवार्षिक पर्जन्यमान 
- ३९७ - मिमी पाऊस यावर्षी सिरसाळा मंडळात  

आढावा घेत आहोत
परळी तालुक्यातील या गावात दोन महिन्यांपासून पाऊस नाही. पिकांचा अंदाज व आढावा घेण्याचे काम तालुका कृषी कार्यालयामार्फत सुरू आहे.
- अशोक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, परळी वैजनाथ

बळीराजा काय म्हणतो?

- गोदाकाठच्या या भागात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने गुंगारा दिला आहे. पाण्याचा ठणठणाट आहे. उसाचे उत्पन्न हुमणीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात घटणार आहे. गेल्या वर्षीचे कापसाचे बोंडअळीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. - राजाभाऊ पौळ 

- सोयाबीनवर केलेला खर्चही निघणे अशक्य आहे. पावसाअभावी खरीप पिके हातची गेली आहेत व रबी पिकाची पेरणी शक्य नाही. - बाजीराव काळे 

- पोहनेरसह लगतच्या रामेवाडी, कासारवाडी शिवारातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन दुष्काळ जाहीर करावा. - भगवान पौळ 

- उसाला हुमणीने खाऊन टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचा गोडवा राहणार नाही. परिणामी, हाती काहीच पडणार नाही. शेतकरी संपत चालला आहे. - मुस्सा शेख 
 

Web Title: Drought In Marathwada: richness of Godavari basin is spoiled by drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.