Drought In Marathwada : कोयता घेऊन बेलापूरला जावं की, गावंच कायमचं सोडावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 04:06 PM2018-10-20T16:06:17+5:302018-10-20T16:07:06+5:30

दुष्काळवाडा : धिर्डी गावात तर भयंकर दुष्काळाची चाहूल लागली आहे. 

Drought in Marathwada: Should go to Belapur with a pact, leave the village permanently? | Drought In Marathwada : कोयता घेऊन बेलापूरला जावं की, गावंच कायमचं सोडावं?

Drought In Marathwada : कोयता घेऊन बेलापूरला जावं की, गावंच कायमचं सोडावं?

Next

- अविनाश कदम, धिर्डी, ता. आष्टी, जि. बीड

पाऊस आता येईल, मग येईल. वाट पाहता पाहता शेतात पेरलेलं पीक पुरतं जळून गेलं; पण पावसाचा थांगपत्ताच लागला नाही. त्यामुळे आष्टी तालुक्यात यंदा पुन्हा भयानक दुष्काळाचं संकट उभं राहिलं आहे. धिर्डी गावात तर भयंकर दुष्काळाची चाहूल लागली आहे. आष्टीपासून २० किलोमीटर अंतरावर ९०० लोकसंख्येचे धिर्डी गाव. पावसाळा सुरू होऊन संपला, तरी या गावात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पिके वाया गेली. खरिपाची चिंता रबी हंगामात दुपटीने वाढली आहे.

पाण्यावाचून डोळ्यादेखत पिके जळून गेली. कपाशीचे पीक जळून गेल्याने ती उपटून फेकून दिली. गावातील अनेक शेतकरी ऊसतोडणी व मजुरीसाठी जाण्याच्या तयारीत आहेत. दसरा झाला की कोयता हातात घेऊन बेलापूरला जायचं असं अनेक शेतकºयांनी सांगितले. दोन हातपंपांवरच संपूर्ण ग्रामस्थांची मदार आहे. सुरुवातीची पाच ते दहा मिनिटं हातपंपाला पाणी येत नाही. त्यामुळे हातपंप हापसून हापसून कंबरडे मोडत आहे. 
गावात असणारे सात गावतलाव, एक नदी, चार ओढे यंदा पाऊस नसल्यामुळे अक्षरश: कोरडेठाक पडले आहेत. सततच दुष्काळ पडत असल्याने पाणी पाहायला मिळत नाही. ग्रामस्थ तर गाव कायमचेच सोडून जायच्या विचारात आहेत. 

चार-पाच वर्षांपूर्वीच्या दुष्काळाची आठवण आजही डोळ्यात पाणी आणते. ना काम ना दाम, अनुदान येतं तर खर्च जास्त झालेला. मिळणारे अनुदान कमी, त्यात कोणाला मिळतं, कोणाला तेही मिळत नाही. नुसता देखावा चाललाय बघा, असे इथले शेतकरी संतापाने सांगत होते.

कमी पाण्यावर पिके घ्यावीत

 तालुक्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने खरिपाचे पीक कमी प्रमाणात आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी उपाययोजना करून कमी पाण्यावर आपले पीक कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न करावा. शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पीक विमा भरावा.  - राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी

बळीराजा काय म्हणतो?
- आमच्या गावात तीन-चार वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती राहिलेली आहे. परिणामी, प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही. एकदाचं गाव सोडून जावं वाटतं. -सीताराम साठे 

- मोठी चार-पाच जनावरं आहेत. तीसुद्धा आता चारा नसल्यामुळे विकावी की काय, असं वाटतंय. या दुष्काळी परिस्थितीत आमचीच खायला भ्रांत आहे. मग जनावरांना चारा आणायचा कोठून? - शिवाजी शेळके 

- दुष्काळ पडला की अनुदान मिळेल, असं वाटतं; पण काहीच भेटत नाही. अधिकारी येतील-माघारी निघून जातील आम्हाला मात्र काहीच मिळत नाही. बँकेत खात्यावर काहीच जमा होत नाही, त्यामुळे दुष्काळ पडला काय अन् नाही पडला काय आम्हाला काहीच फरक पडत नाही. - दादा राजपुरी

- शेतातील कापसाचे उभे पीक पाण्याअभावी जळाले, तसेच इतर घेतलेली पिकेही जळत चालली आहेत. पाणीच नाही तर करावे काय, अशी परिस्थिती आमची झाली आहे. - विकास करडुळे 

- माझ्या शेतात जे पेरलं होतं ते पूर्णपणे जळून गेलं. त्यामुळे डोळ्यादेखत पेरलेलं पीक वाया गेलं. सगळ्या आशा संपल्या. आता करावं तरी काय? - गंगाराम करडुळे 

Web Title: Drought in Marathwada: Should go to Belapur with a pact, leave the village permanently?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.