Drought In Marathwada : सोयाबीन गेले, रबीही नाही ! जगायचे आणि जगवायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:26 PM2018-10-29T12:26:20+5:302018-10-29T12:29:57+5:30

दुष्काळवाडा : अंबाजोगाईपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पूस या गावात ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली असता गंभीर दुष्काळाची चाहुल जाणवली.

Drought in Marathwada: Soybean went, Rabi too! How to live and live? | Drought In Marathwada : सोयाबीन गेले, रबीही नाही ! जगायचे आणि जगवायचे कसे ?

Drought In Marathwada : सोयाबीन गेले, रबीही नाही ! जगायचे आणि जगवायचे कसे ?

Next

- अविनाश मुडेगांवकर पूस, ता. अंबाजोगाई, जि. बीड.

विहिरींनी तळ गाठला. सोयाबीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. रबीचा पेरा होणार नाही. स्वत: जगायचे कसे आणि गुरांना जगवायचे कसे, ही चिंता बळीराजाला सतावत आहे. अंबाजोगाईपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पूस या गावात ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली असता गंभीर दुष्काळाची चाहुल जाणवली.  

गावातील लोकांचा उपजिविका शेतीवर आहे. पावसाच्या भरवशावरच इथली शेती अवलंबून आहे. गावचा तलाव भरला तरच विहिरीला व इंधन विहिरीला पाणी मिळते. अन्यथा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. ४ हजार ५०० लोकसंख्येच्या पूस गावाचे भौगोलिक क्षेत्र २४५० हेक्टर असून खरिपाचा पेरा २४१० हेक्टरवर करण्यात आला. सर्वात जास्त सोयाबीनचा पेरा १९१० हेक्टरमध्ये झाला. पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीन हातचे गेले. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

खरिपाच्या पेऱ्यानंतर दोन पावसांमुळे सोयाबीन तग धरत असतानाच तब्बल दोन महिने पावसाने हुलकावणी दिल्याने पीक पूर्णत: उद्धवस्त झाले. गावात सप्टेंबर अखेरपासूनच पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलस्त्रोत  निकामी होत चालल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशा भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांनी करायचे काय?  उत्पन्नच नाही तर मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न करायचे कसे? हे या शेतकऱ्यांचे प्रश्न. दुष्काळाचे सावट घोंघावत असताना सरकारी आणेवारी मात्र ५६ पैशांवर जाऊन पोहचली. ही अनोखी जादू शासनाने कशी केली, असे विचारत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

- ८२, २३० : हेक्टर  अंबाजोगाई तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 
- ७६७६५ : हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र
- ७५५१९ : हेक्टरवर यंदा प्रत्यक्ष पेरणी

- तालुक्यात झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)
२०१४ - ७७९ 
२०१५ - ६३०
२०१६ - ९९० 
२०१७ - ९०२
२०१८ - ६७९ 

उत्पन्नात घट होणार 
अंबाजोगाई तालुक्यात पिकांच्या उत्पन्नात यंदा ४० टक्के  घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी रबी हंगाम होतो की नाही, अशी स्थिती  आहे. याबाबतचा सर्व अहवाल प्रशासनाकडे पाठविला आहे. 
- गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी. 

बळीराजा काय म्हणतो? 

- दुष्काळी  स्थितीमुळे  जनावरांचा प्रश्न बिकट बनला आहे. शेतातील ऊस साखर कारखान्याला घालण्यापेक्षा तो जनावरांसाठी ठेवावा लागणार आहे. रबीअभावी खाण्यासाठी लागणारे धान्यही उपलब्ध होणार नाही. ना पैसा अडका, ना खायला धान्य अशी अवस्था झाली आहे. - पप्पू आदनाक 

- शासनाने शेतावर जाऊन पीकपरिस्थिती व दुष्काळी स्थिती पाहून खरी पैसेवारी जाहीर करावी. - वैजनाथ देशमुख 

- यावर्षी खरीप हंगामात सोयाबीनचा एका पिशवीमागे एक ते दोन क्विंटलचा उतारा आला.  कुटुंब कसे चालवायचे? जनावरांचा सांभाळ कसा करायचा ?  पाणी व चारा कोठून उपलब्ध करायचे ? जनावरे विकायची म्हटले तर बाजारातही भाव नाही.  - तात्याराव हाके  

- माझ्याकडे बारा एकर शेती आहे. विहिरीवर दोन विद्युतपंप चालतात. एक इंधन विहिर आहे. पण  विजेअभावी व  सततच्या बिघाडामुळे पाणी देता येत नाही.  आता यावर्षी पाऊस नाही. म्हणून शेती पिकत नाही. - धोंडिराम शेप

- खरिपाचा हंगाम वाया गेला, रबीची चिंता आहे. निसर्गाने खेळ मांडल्याने पिकतही नाही व विकतही नाही. खायचं काय ? जनावरं कशी सांभाळायची? 
- उत्तमराव बावणे 

Web Title: Drought in Marathwada: Soybean went, Rabi too! How to live and live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.