नशेसाठी मुले गुन्हेगारीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:12 AM2018-11-25T00:12:56+5:302018-11-25T00:13:27+5:30

डिंकसदृश उत्पादने, औषधी बाम असे विविध रासायनिक पदार्थ हे रूमालवर टाकायचे आणि दिवसभर त्याची नशा करायची, असा काहीसा प्रकार ८ ते १८ वर्षे वयोगटातील मुले करीत असल्याचे समोर आले आहे.

Drug Enemy Criminals | नशेसाठी मुले गुन्हेगारीकडे

नशेसाठी मुले गुन्हेगारीकडे

Next
ठळक मुद्देपालकांचे दुर्लक्ष : डिंकसदृश उत्पादने, औषधी बाम रुमालवर टाकून करतात नशा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : डिंकसदृश उत्पादने, औषधी बाम असे विविध रासायनिक पदार्थ हे रूमालवर टाकायचे आणि दिवसभर त्याची नशा करायची, असा काहीसा प्रकार ८ ते १८ वर्षे वयोगटातील मुले करीत असल्याचे समोर आले आहे. चार मुले व त्यांच्या पालकांना पोलिसांनी समज दिली आहे. त्यांचे समुपदेशनही केले आहे. मात्र धक्कादायक म्हणजे एवढ्या कमी वयात ही मुले नशेच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.
पेठबीड भागात राहणारे नागेश खेडकर यांचे कपड्याचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी कामानिमित्त दुकानाच्या वरच्या मजल्यावर गेले. एवढ्यात अवघ्या १० ते १२ वर्षाचा मुलगा भीक मागण्याच्या उद्देशाने दुकानात आला. आत कोणीच नसल्याचे त्याने पाहिले. इकडे तिकडे पाहून त्याने काऊंटरमधील मोबाईल घेत पोबारा केला. हा प्रकार खेडकर यांना परत आल्यावर समजला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.
सपोनि नितीन पगार यांनी पथक पाठवून तपासणी केली. अवघ्या दोन तासात त्या मुलाला पकडण्यात आले. त्याने एका गोदामात मातीत पुरून ठेवलेला मोबाईलही जप्त केला. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात डिंकसदृश वस्तूच्या पाच बाटल्या निघाल्या. आपण नशा करण्यासाठी विकत घेतल्याचे त्याने कबूल केले. हे तू कोणाकडून शिकला, असे विचारल्यावर त्याने आणखी चौघांची नावे सांगितले. पोलिसांनी मुले व त्यांच्या पालकांची भेट घेऊन समुपदेशन करण्याबरोबरच जागरूक राहण्याबद्दल सूचना केल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे सपोनि नितीन पगार, दरोडाचे सपोनि गजानन जाधव, शहर ठाण्याचे एस.एस.काळे, ए.एम. पठाण, एम.जोगदंड, एस.एम. सारणीकर आदींनी केली. तक्रारदाराने मुलगा लहान असल्याने फिर्याद दिली नाही.
क्रीडा संकुल
बनले ‘अड्डा’
शाहूनगर व खंडेश्वरी मंदिर परिसरातील रहिवासी असलेली ही छोटी मुले रोज सायंकाळी जिल्हा क्रीडा संकुलात एकत्र जमतात.
येथे सोबत बसून नशा करीत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
संकुल हा त्यांचा रोज भेटण्याचा आणि नशा करण्याचा ‘अड्डा’च बनला होता.
वारंवारच्या घटनेनंतरही पालक अनभिज्ञच
मागील काही दिवसांपासून लहान मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. यापूर्वी नशा करणाºया अनेक मुलांना पकडले होते. तर पालकांच्या दुर्लक्षामुळे मुले खेळणी समजून बंदूक शाळेत घेऊन जात असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वारंवारच्या घटनेनंतरही अद्याप पालक जागरूक झालेले नसल्याचे यावरून स्पष्ट होते.
पैसे नसल्याने त्याने चोरला मोबाईल
सपोनि नितीन पगार व त्यांच्या पथकाने पकडलेल्या मुलाने चोरीची कबुली दिली. नशा करण्यासाठी फेव्ही क्विक लागत होते. आणि ते घ्यायला पैसे नव्हते. मोबाईल विक्री करून आलेल्या पैशातून ते खरेदी करणार असल्याचे त्यांने पोलिसांना सांगितले. केवळ नशापायी तो अवघ्या १० व्या वर्षी गुन्हेगारीकडे वळला आहे.
लक्ष ठेवा, काळजी घ्या
आपले पाल्य कोठे जाते, काय करते, कोणासोबत जाते, त्याचे मित्र कोण आहेत, ते कसे आहेत, याची माहिती ठेवणे पालकांनी गरजेचे आहे.
पालकांनी लक्ष ठेवल्यास मुले वाईट वळणाला लागणार नाहीत. याबाबत पालकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Drug Enemy Criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.