दारुड्या चालकाने घेतला बळी; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 07:32 PM2023-06-23T19:32:51+5:302023-06-23T19:33:16+5:30
चारचाकीचा चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
- नितीन कांबळे
कडा - भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजता बीड-नगर महामार्गावर धामणगावजवळ झाली. अनिल पिंपळे असे मृताचे नाव असून अपघातात त्याची पत्नी आणि मुलगा जखमी झाला आहे. दरम्यान, चारचाकी चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, अनिल पिंपळे ( ३२ ) हा देवळाली रहिवासी आहे. त्याचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. आज सायंकाळी तो पत्नी आणि मुलासह धामणगाव येथे मासे विक्रीसाठी बीड- नगर महामार्गावर दुचाकीवरून (एच ०४ डी.एन.१७१०) प्रवास करत होता. दरम्यान, धामणगावजवळ झिंजुर्कॅ वस्तीच्या वळणावर भरधाव वेगातील अनियंत्रित कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अनिलचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी पपीता ( ३० ) आणि मुलगा मंगेश ( १६) गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहे.
चारचाकी चालक होता नशेत
दरम्यान, चारचाकीचा चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कारमध्ये देखील दारूच्या बॉटल आढळून आल्या आहेत. अपघातानंतर चालक तेथून पसार झाला आहे. चालकाने दारूच्या नशेत कार चालवल्याने मात्र एका कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला आहे.