मद्यपान करणारे कर्मचारी बदलले, कारवाई गुलदस्त्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:07+5:302021-01-16T04:38:07+5:30
माजलगाव : तालुक्यातील मोगरा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावर कर्तव्य बजावण्यासाठी मतदान साहित्य घेऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क मद्यपान पार्टी ...
माजलगाव : तालुक्यातील मोगरा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावर कर्तव्य बजावण्यासाठी मतदान साहित्य घेऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क मद्यपान पार्टी केली असता गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. यानंतर प्रशासनाने कर्मचारी तडकाफडकी बदलले. मात्र, काय कारवाई केली हे गुलदस्त्यातच आहे.
माजलगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींची शुक्रवारी निवडणूक असल्याने त्यासाठी सर्वच गावच्या मतदान केंद्रांवर नियुक्त केलेले कर्मचारी गुरुवारी सायंकाळी गावात मतदान साहित्यासह पोहोचले. मोगरा गावात जाऊन या कर्मचाऱ्यांंनी पेेट्या व साहित्य ठेवल्यानंतर त्या ठिकाणी ते मद्यपान करीत असल्याचे निवडणुकीतील उमेदवार आणि गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी मतदान केंद्रावर मद्यपान करत असताना कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून पांडुरंग देशपांडे, तर मतदान अधिकारी म्हणून पी. एन. तायडे, बाबासाहेब इंगोले, आसाराम कुरे, वंदना कदम यांची नियुक्ती होती. गावकऱ्यांनी ही माहिती तसेच व्हिडिओ क्लिप निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार वैशाली पाटील यांच्यापर्यंत पाठवली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना या केंद्रावरून बदलून राखीव कर्मचारी हरिहर देशमुख यांना केंद्राध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मतदान अधिकारी म्हणून एस. पी. जैस्वाल, दादासाहेब कचरे, कैलास आळणे, शिल्पा कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली. या प्रकरणातील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून, चर्चा होत आहे. दरम्यान, मद्यपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली असली तरी हा प्रकार गंभीर असल्याने ठोस कारवाई अद्याप का केली नाही, हे गुलदस्त्यातच आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल येणे बाकी आहे, तो आल्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले.