मयत जन्मल्यामुळे ७५ वर्षीय आजीबाईनेच फेकले ‘ते’ अर्भक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 05:44 AM2018-07-28T05:44:52+5:302018-07-28T05:45:25+5:30
कसलाही माग नसताना पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला
बीड : माणुसकीला काळीमा फसणारी आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा तपास बीड शहर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात पूर्ण केला आहे. स्त्री जातीचे मयत अर्भक जन्मल्यामुळेच आपण ते नालीत फेकून दिल्याची कबुली ७५ वर्षीय आजीबाईने दिली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कुठलाही धागादोरा नसल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर होते. परंतु त्यांनी यशस्वी करून दाखविले.
२३ जुलै रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील उषा (वय२५, नाव बदललेले) या महिलेची जिल्हा रूग्णालयात प्रसुती झाली. परंतु तिच्या पोटी जन्मलेले स्त्री जातीचे बाळ मयत निघाले. डॉक्टरांनी हे बाळ नातेवाईकांच्या स्वाधीन केले. यावेळी उषा सोबत दगडाबाई (वय ७५ नाव बदललेले) या आजीबाई होत्या. उषाची प्रकृती स्थिर असल्याने ती लगेच झोपी गेली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास दगडाबाई उठल्या आणि मयत अर्भक पिशवीत टाकून जिल्हा रूग्णालयाबाहेर पडल्या. जुन्या एसपी आॅफिसजवळ गेल्यानंतर त्यांनी आजुबाजूला कोणी नसल्याची खात्री केली आणि अर्भक नालीत टाकून परतल्या. सकाळी दहा वाजेपर्यंत तर या अर्भकाचे कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडले. यामध्ये अर्भकाचा कंबरेपासून वरील भाग तुटला होता. याची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी धाव घेत अर्भक ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.
दरम्यान, या प्रकरणात तपास करण्यासाठी पोलिसांना कसलाही क्ल्यू नव्हता. परंतु तपासअधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड यांनी पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरविली. जिल्हा रूग्णालयातील सर्व कागदपत्रे ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना एक मयत अर्भकाची माहिती मिळाली. सूत्रांकडून माहिती घेत खात्री केली. त्यानंतर दगडाबाई यांना ताब्यात घेतले. त्यांनी आपणच हे कृत्य केल्याचा कबुली जबाब दिल्याचे सुलेमान यांनी सांगितले. शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दगडाबाईला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
ही पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या कारवाई मार्गदर्शनाखाली पोनि सय्यद सुलेमान, पोउपनि मनिषा जोगदंड, राधा तुरूकमारे, गोरख गांधले यांनी केली.
चार दिवसांत ६५ मुलींचा जन्म
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी २० ते २४ जुलै दरम्यान किती मुली जन्मल्या, ही माहिती जिल्हा रुगणालयामधून पोलिसांनी काढली. यामध्ये ६५ मुली जन्मल्याचे समजले. तर २३ तारखेला पहाटे एक मयत अर्भक जन्मल्याचेही समजले. यावरच त्यांना संशय बळावला. खात्री केल्यानंतर पोलिसांचा अंदाज खरा ठरला.
डीएनए तपासणी होणार
आजीबाईने कबुली जबाब दिला असला तरी अर्भकाचे डीएनए घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. सध्या आजीबाईने कबुली जबाब दिला आहे. यात आणखी पुरावे जमा करणे सुरू असल्याचेही पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी सांगितले.