दुष्काळमुक्तीसाठी एकीची वज्रमूठ करा - आमीर खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:04 AM2018-04-12T00:04:37+5:302018-04-12T00:04:37+5:30
ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. येथील ११३ गावांतील ६५४ लोकांनी प्रशिक्षण घेतले असून, असेच जोमाने काम करा. तालुक्यातील काम पाहून आनंदित झालो असून, पुढील महिन्यात श्रमदानासाठी येणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी एकीची वज्रमूठ बनवा असे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख तथा अभिनेते आमिर खान यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. येथील ११३ गावांतील ६५४ लोकांनी प्रशिक्षण घेतले असून, असेच जोमाने काम करा. तालुक्यातील काम पाहून आनंदित झालो असून, पुढील महिन्यात श्रमदानासाठी येणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी एकीची वज्रमूठ बनवा असे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख तथा अभिनेते आमिर खान यांनी केले.
आष्टी तालुक्यात बुधवारी सकाळी पाणी फाऊंडेशनच्या कामासंदर्भाने भेट देण्यासाठी ते आले होते. पुढे बोलताना अमीर खान म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याने पाणी फाऊंडेशन ही सामाजिक चळवळ सुरू केली आहे. त्यात जास्तीत जास्त गावांनी सहभाग नोंदवून बक्षीसपात्र व्हावे. यासाठी एकीचे बळ निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. तालुक्यात होत असलेल्या कामावर समाधान व्यक्त करून पुढील महिन्यात मी स्वत: श्रमदानासाठी आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात येणार असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांनी स्वागत केले.
यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी स्वागत केले. प्रवीण काथवटे, गणेश काकडे, संभाजी इंगोलेसह पाणी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडीत ‘तुफान आलंय’ गीताच्या चित्रीकरणासाठी आमिर खान आले होते. नगरला जास्त गर्दी होईल म्हणून त्यांनी आष्टीत मुक्काम करून सकाळी चर्चा केली. नंतर ते रवाना झाले.