दुष्काळातही उत्कृष्ट नियोजनाने माळरानावर फुलविली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:04 PM2019-01-03T12:04:25+5:302019-01-03T12:04:36+5:30

यशकथा : दुष्काळातही हिरवेगार रान पाहून इतर शेतकरी अचंबित होत आहेत.

Due to good planning, due to good planning, there is a blooming farming | दुष्काळातही उत्कृष्ट नियोजनाने माळरानावर फुलविली शेती

दुष्काळातही उत्कृष्ट नियोजनाने माळरानावर फुलविली शेती

googlenewsNext

- अनिल महाजन ( धारूर जि. बीड) 

बीड जिल्ह्यातील पांगरी, ता. धारूर येथील शेतकरी साहेबराव शहाजी थोरात यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करीत माळरानावर हिरवीगार शेती फुलविली. दुष्काळामुळे परिसरात सगळीकडे कोरडे रान दिसत असताना, साहेबराव यांचे हिरवेगार रान पाहून शेतकरी अचंबित होत आहेत. अर्थात यासाठी साहेबराव यांचे उत्कृष्ट नियोजन व काबाडकष्टाचे हे फळ आहे.

निसर्गाशी सामना करीत साहेबराव यांनी ही किमया साध्य केली आहे. ज्वारीसह विविध जोमदार असलेली पिके पाहण्यासाठी त्यांच्या शेतात शेतकरी भेट देत आहेत. पांगरी येथे  साहेबराव थोरात यांच्याकडे १६ एकर शेतीपैकी बहुतांश जमीन कोरडवाहू आहे. दुष्काळाची चाहूल लागल्यावर सजग होत सुरुवातीला कमी कालावधीतील पिके घेतली. उपलब्ध पाण्याचा विचार करून शेतीचे नियोजन केले. १६ एकरपैकी वहीतीस येईल तेवढीच जमीन कसली. 

२ एकरात ज्वारी, २५ आरमध्ये गहू, १५ आरमध्ये कांदा, २ आरमध्ये मिरची लावून दुष्काळी परीस्थितीत चांगली सांभाळली. दोन एकरात असलेल्या ज्वारीपासून त्यांना अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत तर कडब्यापासून किमान चाळीस हजार रुपयांपर्यंत कडबा (चारा) असे एकूण दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, इतके दमदार ज्वारीचे पीक आले आहे. तर गव्हाच्या उत्पन्नातून अंदाजे  अंदाजे ३०  हजार रुपये उत्पन्न मिळेल, तसेच कांदा पीकही जोमात असून त्यापासूनही चांगली अर्थिक प्राप्ती होणार असल्याचे साहेबराव थोरात यांनी सांगितले. या पिकांची देखभाल व मशागत ते स्वत:च करतात. त्यामुळे निसर्गाची परिस्थिती विरोधात असतानाही साहेबरावांनी कष्टाच्या बळावर दुष्काळावर मात केली आहे. त्यांच्या या नियोजनबद्ध शेतीचे सर्वत्र कौतुक होत होते.

खरीप हंगामात याच जमिनीवर तीन बॅग सोयाबीनचा पेरा केला होता. अल्प पाऊस आणि त्यामुळे पडलेला दुष्काळ यात सोयाबीनचे पीक हातचे गेले होते. तीनबॅगसाठी नांगरणी, पेरणी, खुरपणी, फवारणी ते काढणीपर्यंत २८ ते ३० हजार रु पये खर्च केला होता. ३५ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न अपेक्षित असताना  अल्प उत्पन्न झाले. खरीप हंगाम वाया गेला. जनावरांना जगवण्यासाठी चारा प्रश्न गंभीर बनला. चाऱ्यासाठी ज्वारीची पेरणी करण्यासाठी जमिनीत ओल नव्हती. त्यामुळे त्यांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून जमीन भिजवून ज्वारी पेरली. शेतातील इंजिनच्या आधारे जमीन भिजवत या ठिकाणी ज्वारीची पेरणी केली. पाण्याचा अंदाज घेत गहू, कांदा आदी पिकेही कमी क्षेत्रावर घेत चांगली जोपासली. परिसरात हिरवे रान कमी असल्याने त्यांच्या शेतात रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे; मात्र साहेबराव हे रात्रंदिवस पिकाचे रक्षण करीत आहेत. 

पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाण्यावर दुष्काळातही हिरवीगार शेती फुलविता येते हे साहेबराव यांनी सिद्ध करून दाखविले आहे. घाबरून न जाता संकटांशी सामना केला, तर यश नक्कीच मिळते असा सल्ला साहेबराव थोरात देतात.

Web Title: Due to good planning, due to good planning, there is a blooming farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.