पोलिसांच्या श्रमदानातून माळरानावर फुलली वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:32+5:302021-04-19T04:30:32+5:30
पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या शेजारीच असलेल्या पडीक जागेवर स्वच्छता करून ...
पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या शेजारीच असलेल्या पडीक जागेवर स्वच्छता करून नयनरम्य परिसर करण्याचा संकल्प केला. जुलै महिन्यात या परिसरात वड, पिंपळ, उंबर, चिंच, लिंबू, पेरू, सीताफळ, सागवान, पळस, गुलमोहर व विविध प्रकारची झाडे पोलीस व काही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींच्या सहकार्याने लावली. ही झाडे आता उंच मोठी झाली असून, यातून ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे. पो. नि. पुर्भे पूर्वी ज्या ठिकाणी नोकरीला होते त्या ठिकाणी त्यांनी वृक्ष लागवड केली आहे. कन्नड, खुलताबाद, शिवाजीनगर बीड, जवाहर, ठाणे, येथील पोलीस ठाण्यात त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम राबवून यशस्वी केला आहे. परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरात ग्रामीण पोलिसांनी वृक्षलागवड करून त्याचे संगोपन केले व झाडांना पाणी देण्यासाठी ड्रिप एरिगेशन सिस्टीम केली आहे. ही वनराई फुलविल्याने हा परिसर आकर्षक व लक्षवेधी झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.
पोलीस ठाणे मॉडेल ठरावे
पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे व पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमातून लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन केले जात आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या वनराईमुळे दैनंदिन कामाचा पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. प्रदूषणग्रस्त परळी परिसरात जतन केलेल्या झाडांमुळे शुद्ध ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल. परळी ग्रामीण पोलीस ठाणे भविष्यातील मराठवाड्यात मॉडेल ठरेल. - चेतन सौंदळे -वृक्षमित्र तथा नगरसेवक, परळी.
===Photopath===
180421\img-20210418-wa0237_14.jpg~180421\img-20210416-wa0151_14.jpg