नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे माजलगावात घाणीचे साम्राज्य, शहरात साथरोगांचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 06:42 PM2017-10-23T18:42:01+5:302017-10-23T18:46:47+5:30
केवळ एकाच वर्षातील नगर पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.
माजलगांव ( बीड ) : शहरात गल्ल्या बोळांमध्ये तसेच मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. केवळ एकाच वर्षातील नगर पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.
माजलगांव नगर पालिकेचा कारभार कोणत्याही पक्षाकडे असो शहराची स्थितीत मात्र काहीच बदल दिसत नाही. सहाल चाऊस हे अध्यक्षपदी निवडल्यानंतर कांहीतरी बदल होईल अशा अपेक्षेने माजलगांवकरांना होत्या. मात्र, चाऊस यांच्या सत्तेचे नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर शहराची परिस्थिती पहिल्या सारखीच बकाल झाली आहे.
नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्यात विसंवाद
चाउस यानी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांचे आणि मुख्याधिकारी यांचे न पटल्याने शहराचा विकास खंडीत झाला. साध्या मुलभुत गरजा पुरविण्यात देखील पालिकेला अपयश आले. दोन महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी बी.सी. गावित यांची बदली झाल्यानंतर वडवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे येथील प्रभार आला आहे. मात्र, ते केवळ केवळ कार्यालयीन कामकाजावरच भर देत आहेत.
शहरभर घाणीचे साम्राज्य
मुख्य रस्त्यासह गल्लीबोळांमध्ये जागोजागी कच-यांचे ढिगारे साचलेले आहेत. नाल्या तुंबलेल्या असुन घाण पाणी रस्त्यांवरुन वाहात आहे. साचलेले कच-याचे ढिगारे उचलणे, नाले सफाई व पाईपलाईन लिकेज काढण्यात नगर पालिका असमर्थ ठरत आहे. यामुळे डासांचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून शहरात साथीचे रोग वाढले आहेत. याबाबत येथील मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
सफाई कर्मचा-यांवर होतो लाखोंचा खर्च
नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती डामाडौल असतांना कायम व रोजंदारी कर्मचा-यांवर नगर परिषद दर महिन्याला लाखोरुपयांचा खर्च करते. सध्या पालिकेत 65 कायमस्वरुपी व रांजंदारीवरील 35 असे कर्मचारी सफाई व स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. असे असतानाही केवळ प्रशासकीय नियोजना अभावी शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे.