अवैध वाळू वाहतूक अडविल्याने माफियांची पीएसआयला तुकडे करण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 07:03 PM2019-05-29T19:03:44+5:302019-05-29T19:05:16+5:30
पीएसआय वर्दीवर असतानाही वाळू माफियांनी त्यांची गचुरे पकडून टेम्पो पळवून नेला
बीड : बीड जिल्ह्यात वाळू माफियांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अवैध वाळू वाहतूक करताना टेम्पो अडविल्याने चालकाने चक्क कत्ती काढून पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) तुकडे करण्याची करण्याची धमकी दिली. हा प्रकार शिरूर तालुक्यातील दहिवंडी रोडवरील उत्तमनगर परिसरात २८ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनोज बरूदे हे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाप्रमाणे समन्स वॉरन्ट बजविण्यासाठी आपल्या टीमसह जात होते. याचवेळी त्यांना टेम्पोतून (एमएच २३ एफ एल १८९६) अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याचे दिसले. त्यांनी हात दाखवून टेम्पो थांबविला. याचवेळी चालक देविदास गहिणीनाथ जायभाये (३४ रा.पिंपळनेर ता.शिरूर) हा हातात धारदार कत्ती घेऊन खाली उतरला. ‘तु बाजुला सरक नाहीतर तुझे तुकडे करतो’ असे म्हणत धमकी दिली. एवढेच नव्हे तर बरूदे हे वर्दीवर असतानाही जायभाये याने त्यांची गचुरे पकडले आणि हिसका देऊन टेम्पो घेऊन पलायन केले. त्याच्या हातात कत्ती असल्याने पोलिसांनीही त्याला अडविले नाही. ठाण्यात माहिती देऊन पुढील रस्त्यावर नाकाबंदी केली आणि जायभायेला बेड्या ठोकल्या. त्यानंतर टेम्पो ठाण्यात नेण्यात आला. बरूदे यांच्या फिर्यादीवरून जायभाये विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.