मांजरा धरणात केवळ १.३७ टक्के पाणीसाठा राहिल्याने पाणीपुरवठा योजनांवर जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:18 PM2018-10-03T16:18:12+5:302018-10-03T16:23:46+5:30
मांजरा धरणात चार महिने संपले, पावसाळा लोटला, तरी अद्यापही धरणात पाणी आले नाही.
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंब या मोठ्या शहरांसह आसपासच्या खेडयापाडयांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात चार महिने संपले, पावसाळा लोटला, तरी अद्यापही धरणात पाणी आले नाही. परिणामी आगामी काळात सात लाख नागरिकांची तहान भागवायची कशी, हा मोठा प्रश्न प्रशासनाला भेडसावणारा ठरत आहे. परतीचा पाऊस झाल्यानंतर धरणाचा पाणीसाठा वाढेल, अशी अपेक्षा लोक बाळगून होते. मात्र, तीही फोल ठरली. पावसाने दिलेल्या दग्यामुळे भविष्यात मोठे जलसंकट निर्माण होणार आहे.
अंबाजोगाई व परिसरात जूनच्या प्रारंभीपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. झालेल्या पावसामुळे पेरण्या झाल्या मात्र, पाणीसाठा वाढला जाईल, असा एकही पाऊस जून ते सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत झाला नाही. जर आष्टी, पाटोदा, मांजरसुंबा या परिसरात मुसळधार पाऊस झाला तरच मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ होते. मात्र, गेल्या वर्षी मोठा पाऊस झाल्याने धरण भरले होते. भरलेल्या धरणातील पाणी शेतकऱ्यांना देण्यात आले होते. तसेच पाणीपुरवठा योजनांची मोठी भिस्त असते. यावर्षी धरणातला पाणीसाठा शंभर टक्क््यावरून १.३७ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. ९८ टक्के पाण्याचा वापर वर्षभरात झाला.
या हंगामात आतापर्यंत एकही मोठा पाऊस न झाल्याने जमिनीवरून पाणी अद्यापतरी वाहिले नाही. परिणामी मांजरा धरणातील पाणीसाठा अद्यापही वाढला नाही. शहराच्या पाणीपुरवठ्याची मोठी भिस्त मांजरा धरणावरच आहे. मांजरा धरणातील पाणीसाठा संपत आल्याने धरणातून पाणीपुरवठा कधी ठप्प होईल. याची धास्ती अंबाजोगाईकरांना आहे. अत्यल्प पावसामुळे मांजरा धरणात केवळ १.३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन तसेच पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता हा साठा आणखी कमी होणार आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा आधार घेतला जातो.
उपलब्ध असलेले पाणी कसेबसे तीन ते चार महिने शहरवासियांना देता येईल. संपूर्ण पावसाळा लोटला तरी एकदाही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील सर्वच जलस्त्रोत निकामी झाले आहेत. ग्रामीण भागातही पाण्याची स्थिती पावसाअभावी दयनीय झाली आहे. परतीच्या पावसाच्या अपेक्षा बाळगून शेतकरी व नागरिक आशा ठेवून होते. मात्र तीही फोल ठरली. आता दसऱ्याच्या कालावधीत तरी पाऊस पडतो की नाही हीच शेवटची आशा शेतकरी बाळगून आहेत.
पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित
मांजरा धरणात सध्या १.३७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. धरणात पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने शेती अथवा इतर बाबींना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे, अशी माहिती मांजरा धरणाचे उपअभियंता महेंद्र जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मांजराभोवतालचे प्रकल्पही कोरडेठाक
मांजरा धरणात पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी डोकेवाडा, अप्परमांजरा, वाघेबाभुळगाव, महासांगवी हे प्रकल्प भरल्यानंतर पाण्याचा प्रवाह धरणात येतो. संपूर्ण पावसाळा लोटला तरी मोठा पाऊस न झाल्याने आजूबाजूचे प्रकल्पच भरले नाहीत. तर धरणात पाणी येणार कोठून? अशा स्थितीमुळे पाणीपुरवठ्याची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण पावसाळा संपला तरी पाऊस न झाल्याने पाण्याचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.