बीडमध्ये खाजगी क्लासेसवाल्यांमुळे रोडरोमिओंना मोकळे रान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:38 AM2018-06-23T00:38:38+5:302018-06-23T00:41:07+5:30
अंबाजोगाई शहरातील आंबेडकर चौक ते तथागत चौक हा रस्ता रोडरोमिओंचा अड्डा बनला आहे. याच रस्त्यावर बहुतांश क्लासेस असल्याने टवाळगिरी करणाऱ्या रोडरोमिओंना मोकळे रान मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी क्लासला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग याच रस्त्यावर झाल्याने पालकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील आंबेडकर चौक ते तथागत चौक हा रस्ता रोडरोमिओंचा अड्डा बनला आहे. याच रस्त्यावर बहुतांश क्लासेस असल्याने टवाळगिरी करणाऱ्या रोडरोमिओंना मोकळे रान मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी क्लासला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग याच रस्त्यावर झाल्याने पालकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. सातत्याने असे प्रकार घडूनही पोलीस प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. शिक्षणासाठी बाहेर गावाहून येणाºया विद्यार्थ्यांची इथे मोठी संख्या आहे. सर्वच प्रकारचे शिक्षण अंबाजोगाईत उपलब्ध असल्याने दूरदूरहून पालक आपल्या विद्यार्थ्यांना अंबाजोगाई हे सुरक्षित ठिकाण असल्याने बिनधास्त शिक्षणासाठी ठेवतात. मात्र, गेल्या काही वर्षात रोडरोमिओंच्या वाढत्या टिंगल-टवाळकीमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे.
दोन दिवसांपूर्वी आंबेडकर चौक ते तथागत चौक या रस्त्यावर क्लासला गेलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग टवाळखोरांकडून करण्यात आला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्या मुलीच्या भावास सात युवकांनी बेदम मारहाण केली. त्या सात जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रोडरोमिओंची दहशत विद्यार्थिनींसाठी असुरक्षितता बनली आहे.
पोलीस प्रशासनाने वेळीच पायबंद घातला तर विनयभंगासारखे प्रकार घडणार नाहीत. अन्यथा रोडरोमिओंच्या सुळसुळाटामुळे परिसरात असुरक्षिततेचे निर्माण झालेले वातावरण शहरवासियांसाठी घातक ठरणारे आहे.
पथदिवे बंद असल्याचा फायदा घेत रोमिओंकडून काढली जाते छेड
तथागत चौक ते आंबेडकर चौक परिसरातील पथदिवे रोडरोमिओंनी फोडून टाकल्याने कायम अंधाराचे साम्राज्य असते. याचा गैरफायदा रोडरोमिओ घेतात. पाच वर्षांपासून क्लासचालकांनी या रोडवर आपली दुकाने थाटली आहेत. क्लासेसवाल्यांच्या वाहनांच्या पार्किंगमुळेही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. अनेक टवाळखोर युवक मुलींच्या सायकलची हवा सोडणे, त्यांच्या दुचाकीची नासधुस करणे असे हमखास प्रकार घडतात. मात्र, क्लासेसवाल्यांना याचे कसलेही सोयरसुतक नाही. पालकही निमूटपणे हा प्रकार सहन करतात. परिणामी अंबाजोगाई शहरातील शैक्षणिक व सांस्कृतिक ओळख अशा दुर्घटनांमुळे धुसर होत चालली आहे.