आरोग्य केंद्रातील औषधांच्या तुटवडयाने माजलगाव तालुक्यात रुग्णांचे हाल, तीन महिन्यांपासून करतात बाहेरुन औषध खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:00 PM2017-10-25T17:00:36+5:302017-10-25T17:03:34+5:30
मागील तीन महिन्यांपासुन औषधांची मागणी वरिष्ठ कार्यालयांना केली असून यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने आणखी कारवाई केली नाही. यामुळे मात्र, रुग्णांचे हाल होत असून त्यांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहेत.
- पुरुषोत्तम करवा
माजलगांव ( बीड) - तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये मोठया प्रमाणावर औषधांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. मागील तीन महिन्यांपासुन औषधांची मागणी वरिष्ठ कार्यालयांना केली असून यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने आणखी कारवाई केली नाही. यामुळे मात्र, रुग्णांचे हाल होत असून त्यांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहेत.
शासकीय आरोग्य केंद्र हीच ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जातात. या ठिकाणी अत्यल्प शुल्क घेऊन उपचारासोबतच औषधदे सुद्धा मिळतात. माजलगांव तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व 22 उपकेंद्रे आहेत. शिवाय माजलगांव शहरात ग्रामिण रुग्णालय देखील आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये मागील तीन महिन्याच्या काळात मोठया प्रमाणावर औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे.
यातच सध्या वातावरणातील बदल आणि वाढत चाललेल्या संसर्गजन्य रोगांमुळे नागरीक बेहाल आहेत. अशा काळात रुग्णालयात उपचारासाठी येणा-यांची संख्या जास्त आहे. परंतु; येथे उपचारासोबत औषधी मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. रुग्णांना बाहेरुन गोळया औषधांची व्यवस्था करावी लागत आहे. यामुळे मोठया प्रमाणावर आर्थिक भुर्दंडाला रुग्णास सामोरे जावे लागते.
तीन महिने पहावी लागणार वाट
जिएसटीच्या कारणावरुन टेंडर न निघाल्यामुळे आणखी तीन महिने औषधी उपलब्ध होऊ शकणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गरजेपुरते औषध खरेदी करून दिलासा
औषधांच्या तुटवडया संदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार तसेच अहवाल पाठविलेले आहेत. रुग्णांना गरजेपुरते औषधी खरेदी करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत.
- डॉ.अनिल परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी