परळी औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाची टंचाई, विजनिर्मितीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 07:18 PM2018-09-11T19:18:03+5:302018-09-11T19:18:51+5:30
नविन औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मिती साठी लागणारा कोळसा एक दिवस पुरेल एवढाच उपलब्ध आहे.
परळी (बीड ) : नविन औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मिती साठी लागणारा कोळसा एक दिवस पुरेल एवढाच उपलब्ध आहे. त्यामुळे संच बंद पडून विज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज नविन औष्णिक विद्युत केंद्रातील प्रत्येकी 250 मे.वॅ.क्षमतेचे तीन संच चालू होते. सायं. 6 च्या सुमारास 3 संचातून 615 मे.वॅ.एवढी विजनिर्मिती चालू होती तर 135 मे.वॅ.विजेची तुट भासली.
परळी तालुक्यातील दाऊतपुर शिवारातील नविन औष्णिक विद्युत केंद्रात 250 मे.वॅ.स्थापित क्षमतेचे संच क्र.6,7 व 8 हे तीन संच आहेत. या तीन संचाची एकूण क्षमता 750 मे.वॅ एवढी आहे. कोळशा अभावी विजनिर्मितीवर परिणाम दिसून येत आहे. मंगळवारी तिन्ही संचातून 615 मे.वॅ. एवढे विजेचे उत्पादन चालू होते. काही दिवसांपासून कोळशाचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नाही. मंगळवारी 1 दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली.
मुख्य अभियंता श्री प्रकाश खंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, नविन औष्णिक विद्युत केंद्रातील तिन्ही संच मंगळवारी चालू होते. प्रत्येक संचातून 205 मे.वॅ. एवढी विज निर्मिती चालू आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रात एक दिवस पुरेल एवढा कोळसा साठा उपलब्ध आहे. कोळशाचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी मुख्य कार्यालय मुंबईकडे पाठपुरावा चालू आहे. वणी ,चंद्रपूर व हैद्राबाद जवळील खाणीतून रेल्वे वॅगन ने परळी विदुत केंद्रात कोळसा येतो.
नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रं.6 देखभाल दुरूस्ती नंतर 8 सप्टेंबर पासून कार्यान्वीत झाला आहे. तर संच क्रं. 7 व 8 हे दोन संच पुर्वीपासूनच चालू आहेत. मुख्यअभियंता प्रकाश खंडारे हे परळी औष्णिक विद्युत केंद्रात कांही दिवसांपुर्वीच रूजू झाले आहेत. त्यांनी कामाची चुनूक दाखविण्यास सुरूवात केली आहे. विजनिर्मिती वाढविण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय साधून व त्यांच्याकडून कामे करून घेवून परळी औष्णिक विद्युत केंद्राची विजनिर्मिती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
जुने बंद संच ही चालू करावे
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र.3,4 व 5 हे तीन संच गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. त्याचा परळीच्या बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम जाणवत आहे. कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. कंत्राटदार व सप्लायर्स यांचेही कामे बंद झाली आहेत. त्यामुळे परळीत बेरोजगारी वाढली आहे. यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही लक्ष घालून जुने तीन संच चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.