म्हाडाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी, आरोपी बीड गुन्हे शाखेच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:43 PM2022-02-01T12:43:04+5:302022-02-01T12:43:12+5:30
मंगळवारी बीड येथील आदर्शनगर भागातील दिशा संगणक केंद्रावर अर्जुन हा परीक्षा देत होता. त्याच्याकडून एक मोबाईल बॅटरी, कानातला मायक्रो हेडफोन आणि काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले आहे.
बीड : आज राज्यातील विविध केंद्रांवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागाची परीक्षा होत आहे. यात बीडमध्ये एक डमी विद्यार्थी आढळल्याची घटना घडली आहे. अर्जुन बिघोट असे या तरुणाचे नाव असून, त्याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. वडझरी येथील राहुल किसन सानप या परीक्षार्थीच्या नावावर अर्जुन हा परीक्षा देत होता अशी माहिती पुढे आली आहे.
मंगळवारी बीड येथील आदर्शनगर भागातील दिशा संगणक केंद्रावर अर्जुन हा परीक्षा देत होता. त्याच्याकडून एक मोबाईल बॅटरी, कानातला मायक्रो हेडफोन आणि काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले आहे. दरम्यान पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना आरोपीला जालना रोड परिसरात एका बँकेच्या समोर पोलीस कर्मचारी संगीता शिरसाट, संजय राठोड, मोहसीन शेख आणि जेल पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पकडले.
शिवाजी नगर पोलिसांनी या डमी विद्यार्थ्याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस कर्मचारी संगीता शिरसाट यांनी सांगितले. पकडण्यात आलेला डमी परीक्षार्थी अर्जनु बाबुलाल बिघोट हा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवखेडा येथील असल्याचे सांगण्यात आले. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.