कोविडकाळात शिक्षकांनी पिढी वाचविण्याचे काम केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:02+5:302021-09-18T04:37:02+5:30
बीड : कोविड-१९ च्या कालावधीमध्ये गुरुजनांनी चेकपोस्टवर नोंदी घेण्याचे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम केले. या कामात बीड जिल्हा ...
बीड : कोविड-१९ च्या कालावधीमध्ये गुरुजनांनी चेकपोस्टवर नोंदी घेण्याचे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम केले. या कामात बीड जिल्हा पहिला आहे. पिढी घडविणाऱ्या शिक्षकांनी पिढी वाचविण्याचे कार्य केले. बदलत्या काळाचे आव्हान स्वीकारून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिवकन्या शिवाजीराव सिरसाट उपस्थिती होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार उपस्थित होते.
यावेळी जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोडविण्याची ग्वाही दिली.
प्रास्तविक शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. मुलांसाठी झटणाऱ्या शिक्षकांचा प्रातिनिधिक सत्कार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते ११ प्राथमिक, १० माध्यमिक आणि १ विशेष अशा २२ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षण विभागाच्या चित्रफितीची पालकमंत्र्यांनी प्रशंसा केली. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काशीद यांनी केले. डॉ. विक्रम सारूक यांनी आभार मानले.
देवाइतकाच गुरुजनांवर विश्वास
आई-वडील स्वाभाविक मुलांना डोळ्यापासून दोन मिनिटे दूर ठेवू शकत नाहीत. शाळेत आई-वडील निश्चिंत असतात. देवावर विश्वास ठेवावा, तेवढा विश्वास गुरुजनांवर ठेवला जातो. बीड जिल्हा परिषदेच्या शाळेत ३ लाख ७१ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांची जबाबदारी शिक्षक बंधू-भगिनींनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
शाळा दुरुस्तीसाठी ३७ कोटींची तरतूद
बीड जिल्ह्यातील २१७ माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी व १७२ शाळांमधील दुरुस्ती कामे, अशा एकूण ३८९ निजामकालीन शाळांच्या इमारतींच्या पुनरुज्जीवन कामासाठी राज्य शासनाने ३७ कोटी रुपयांची तरतूद केली असून, याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. या शाळांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे पालकमंत्री मुंडे म्हणाले.
170921\17_2_bed_21_17092021_14.jpeg
शिक्षक पुरस्कार सोहळा