भगवानगडाचाही दसरा मेळावा पुन्हा वादात, तीन गावांतील ग्रामस्थांकडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 06:34 AM2022-09-28T06:34:33+5:302022-09-28T06:36:16+5:30
भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा काही वर्षांपूर्वी खंडित झाली होती.
अनिल लगड
बीड : भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा काही वर्षांपूर्वी खंडित झाली होती. ती पुन्हा भगवानगडाच्या पायथ्याशी सुरू करणार असल्याची भूमिका दसरा मेळावा कृती समितीने घेतली आहे; परंतु या मेळाव्याला गडाच्या पायथ्याशी असलेल्या नगर व बीड जिल्ह्यातील तीन गावांतील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव, अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीकासार, मालेवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव घेऊन या मेळाव्याला विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यांनी अहमदनगर व बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
संत भगवानबाबांनी सुरू केलेली परंपरा अखंडित सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीला स्थान न ठेवता यावर्षी भगवानगडावरील होणारा दसरा मेळावा हा धार्मिक व सांस्कृतिक पद्धतीने होणार आहे. वारकरी संप्रदाय हरिनामाचा गजर करीत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. लेझीम, ढोल-पथक, वादक श्रीक्षेत्र भगवान गडाच्या पायथ्यापासून सुरू होऊन भगवानगडापर्यंत जाऊन संपेल. त्यानंतर तिथे सीमोल्लंघन खेळण्यात येईल, असे कृती समितीने स्पष्ट केले.
राजकीय मेळाव्याची परंपरा खंडित
भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे हे गडावर दसऱ्याला मेळावा घेत असत. यानंतर महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना येथे मेळावा घेण्यास विरोध केल्याने राजकीय मेळाव्याची परंपरा खंडित झाली होती.