भगवानबाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:32 PM2018-10-17T23:32:42+5:302018-10-17T23:33:19+5:30
राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगांव घाट येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य दिव्य अशा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगांव घाट येथे मोठ्या थाटात संपन्न होत आहे. करवीरपीठाचे शंकराचार्य श्रीमद् जगद्गुरु विद्या नृसिंह भारती यांच्यासह राज्यभरातून सुमारे तीसहून अधिक संत, महंत आणि भक्ती-शक्तीचा महापूर यावेळी लोटणार आहे. दरम्यान, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी अवघी जन्मभूमी सजली आहे.
कार्यक्रमासाठी भव्य स्टेज
कार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी करण्यात आली असून ७० बाय ७० आकाराच्या भव्य व्यासपीठावर एका बाजूला संत, महंत आणि दुस-या बाजूला मंत्री, आमदार, खासदार व राजकीय क्षेत्रातील मंडळी राहतील. दसरा मेळाव्यासाठी राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. ही गर्दी लक्षात घेवून वाहनांची पार्किंग व इतर व्यवस्था तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. जागोजागी अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची सोय स्वयंसेवकांनी केली आहे.
जन्मभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
पालकमंत्री पंकजा मुंडे व करवीरपठाचे शंकराचार्य हे दोघेही उद्या वेगवेगळ्या हेलिकॉप्टरने सावरगांव घाट येथे येणार आहेत. त्यांच्यासाठी दोन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत.
पंकजा मुंडे सकाळी साडेअकरा वाजता परळी येथून तर सकाळी दहा वाजता शंकराचार्य कोल्हापूर येथून निघणार आहेत. पंकजा यांच्या हेलिकॉप्टरमधून भगवानबाबांच्या मंदिरावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
दरम्यान, ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर्स, घरासमोर रांगोळी, फुलांची आरास, औक्षण व मिरवणूक आदींनी पंकजा मुंडे व खा डॉ प्रीतम मुंडे यांचे स्वागत करण्यासाठी अवघी जन्मभूमी सजली आहे.
खा. प्रीतम मुंडे येणार रॅलीने
दरवर्षी प्रमाणे दसरा मेळाव्यासाठी खासदार डॉ प्रीतम मुंडे ह्यांचे गोपीनाथगड ते सावरगांव घाट अशा भव्य रॅलीने आगमन होणार आहे. उद्या सकाळी सात वाजता गोपीनाथगडावरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्या कार्यकर्त्यांना घेवून वाहनाने सावरगांवला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहेत.
हे राहणार संत, महंत उपस्थित
शंकराचार्य यांच्यासह संत तुकाराम महाराजांचे वंशज संभाजी महाराज मोरे(देहू) पैठणच्या नाथ महाराजांचे वंशज रघुनाथ बुवा पालखीवाले, नांदेडच्या गुरूद्वाराचे ज्ञानी सरबजितिसंगजी, आळंदी संस्थानचे राजाभाऊ चोपदार, बौध्द भिक्खू धम्म ज्योतीजी, महानुभव पंथाच्या सुभद्रा आत्या, अहमदपूरचे डॉ. शिविलंग शिवाचार्य महाराज, कपीलधारचे विरूपाक्ष महाराज, प्रसाद महाराज अंमळनेरकर, सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, पोहरादेवीचे रामराव महाराज, शांतिगिरी महाराज वेरूळ, भास्कर गिरी महाराज देवगढ, विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड, शिवाजी महाराज नारायणगड, राधाताई सानप महासांगवी, त्रिविक्र मानंद सरस्वती पिंपळनेर, महादेव महाराज चाकरवाडी, रामदास महाराज सानप, प्रकाश बोधले महाराज, रामराव महाराज ढोक, अर्जून महाराज लाड, नवनाथ महाराज आंधळे, बुवा महाराज खाडे, यादवबाबा महाराज लोणी, परमेश्वर महाराज जायभाये, हरिहर महाराज दिवेगांवकर, सुदाम महाराज पानेगांवकर, प्रल्हाद महाराज विघ्ने, अर्जून महाराज खाडे