बालरोग तज्ज्ञाला आदेशाविनाच ड्युटी लावली; गेवराई, माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत

By सोमनाथ खताळ | Updated: February 6, 2023 19:54 IST2023-02-06T19:53:21+5:302023-02-06T19:54:38+5:30

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने येथे कंत्राटी पद्धतीने डॉ. प्रवीण सराफ यांची नियुक्ती केली होती. परंतु सुरुवातीचे काही दिवस काम केल्यानंतर प्रशासनाचे तोंडी आदेश असल्याचे सांगून त्यांनी थेट गेवराई गाठले.

duty without a mandate to a pediatrician doctor; Medical Superintendent of Gevrai, Majalgaon hospital in trouble | बालरोग तज्ज्ञाला आदेशाविनाच ड्युटी लावली; गेवराई, माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत

बालरोग तज्ज्ञाला आदेशाविनाच ड्युटी लावली; गेवराई, माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत

बीड : बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण सराफ यांची मूळ नियुक्ती माजलगाव ग्रामीण रुग्णालयात होती. परंतु कसलाही लेखी आदेश नसताना ते गेवराई उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होते. हा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. आता या प्रकरणात लेखी आदेश नसतानाही नियमित ड्युटी लावणारे गेवराईचे वैद्यकीय अधीक्षक आणि बालरोग तज्ज्ञाविना गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळणारे माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक अडचणीत आले आहेत. यामागे ‘राजकारण’ असून आता लोकप्रतिनिधींनी आरोग्यातही ढवळाढवळ सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने येथे कंत्राटी पद्धतीने डॉ. प्रवीण सराफ यांची नियुक्ती केली होती. परंतु सुरुवातीचे काही दिवस काम केल्यानंतर प्रशासनाचे तोंडी आदेश असल्याचे सांगून त्यांनी थेट गेवराई गाठले. गेवराईचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश शिंदे यांनीही आगोदरच दोन बालरोग तज्ज्ञ असतानाही आणि लेखी आदेश नसतानाही त्यांना नियमित ड्युटी लावली. तर दुसऱ्या बाजूला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञाविनाच सिझर व प्रसूती केल्या जात होत्या. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन रुद्रवार यांनी आपण माणुसकीने इतर डॉक्टरांना बोलावत असल्याचे सांगितले होते. परंतु हक्काचा डॉक्टर असताना खासगी व्यक्तीची गरज लागतेच कशाला? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच बालरोग तज्ज्ञ नसतानाही प्रसूती करून ‘रिस्क’ घेतलीच का? असा सवाल उपस्थित होत आहे. या सर्व प्रकारामुळे आता दोन्ही वैद्यकीय अधीक्षक अडचणीत आले आहेत. याची चौकशी करून कारवाई करावी, यासाठी काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. याची आयुक्तांकडे तक्रार केली जाणार असून संबंधितांवर दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दोन्ही वैद्यकीय अधीक्षक अनुत्तरित
याबाबत माजलगावचे डॉ. रुद्रवार यांना सोमवारी विचारणा केल्यावरही त्यांनी आपण गैरहजेरी कळविल्याचे सांगितले आहे. परंतु याची कसलीच नोंद जिल्हा रुग्णालयात नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच गेवराईचे डॉ. राजेश शिंदे म्हणाले, डॉ. सराफ यांचे लेखी आदेश नव्हते. त्यांना नियमित ड्युटी लावली जात होती. परंतु त्या पुढे मी काही बोलू शकत नाही, असे म्हणून अनुत्तरित झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले, संबंधित डॉक्टरला कार्यमुक्त करण्यात येईल.

Web Title: duty without a mandate to a pediatrician doctor; Medical Superintendent of Gevrai, Majalgaon hospital in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.