बीडमध्ये घराणेशाही; पवार, क्षीरसागरांची तिसरी तर मुंडे, मुंदडा, सोळंके, पंडितांची दुसरी पिढी
By सोमनाथ खताळ | Published: May 4, 2024 05:26 PM2024-05-04T17:26:21+5:302024-05-04T17:27:17+5:30
या कुटुंबांनी आपलाच वारसदार राजकारणात पुढे आणल्याने काही ठिकाणी इतरांना संधीच मिळत नसल्याचे दिसत आहे.
बीड : आपलाच वारसदार आमदार, खासदार अन् मंत्री व्हावा, असा काहीसा अलिखित नियम झाला आहे. जिल्ह्यातही अशीच काहीसी परिस्थिती आहे. पवार, क्षीरसागरांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. यासोबतच मुंडे, मुंदडा, सोळंके आणि पंडितांची दुसरी पिढी आता राजकारणात यशस्वी होऊ पाहात आहे. लोक याला घराणेशाही म्हणत आहेत. या कुटुंबांनी आपलाच वारसदार राजकारणात पुढे आणल्याने काही ठिकाणी इतरांना संधीच मिळत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही मतदारसंघात मात्र लोक घराणेशाहीला विरोध करून नवीन चेहरा शोधत असल्याचे दिसत आहे. त्यांच्याविरोधातही नवे नेते, तरुण नेते पुढे येऊ पाहत आहेत.
केज - सासूनंतर सुनेने चालवला वारसा
दिवंगत विमल मुंदडा यांचा केज विधानसभा मतदारसंघात प्रभाव होता. त्यांच्या निधनानंतर सून नमिता मुंदडा समोर आल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करत आमदारकीचा गुलाल उधळला. त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे मतदारसंघात सक्रिय असतात. त्यामुळे मुंदडा कुटुंबांचा संपर्क अधिक आहे.
माजलगाव-सोळंके पिता-पुत्र मंत्री
माजलगावात सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते. त्यांचा वारसा प्रकाश सोळंके यांनी चालवला. तेदेखील मंत्री झाले होते. आता याच कुटुंबातील जयसिंह सोळंके पुढे येत आहेत. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापतीही ते राहिले आहेत.
गेवराई-पवारांची तिसरी, पंडितांची दुसरी पिढी
गेवराई मतदारसंघात सध्या भाजपचे ॲड. लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार आहेत. त्यांचे वडील माधवराव पवार आणि आजाेबा शाहूराव पवारही आमदार होते. आता आ. पवार यांचा पुतण्या शिवराज पवार सक्रिय होत आहेत. यासोबतच माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचीही दुसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. अमरसिंह पंडित हेदेखील आमदार राहिले असून, त्यांचे बंधू विजयसिंह पंडित हे २०१९ ची विधानसभा निवडणूक अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. विजयसिंह हे जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिलेले आहेत. आता या कुटुंबातील रणवीर पंडित, पृथ्वीराज पंडित यांनी संपर्क वाढवला आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांचा मुलगा युद्धजित पंडितही सक्रिय आहेत; परंतु या दोन्ही पंडितांचा एकमेकांना राजकीय विरोध आहे.
बीड-क्षीरसागरांची तिसरी पिढी
केशरकाकू क्षीरसागर यांना पाचवेळा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली. यामध्ये त्यांनी तीनवेळा विजय मिळवला. त्यानंतर त्यांचा वारसा जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुढे चालवला. याच कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे सध्या बीडचे आमदार आहेत. तसेच डॉ. भारतभूषण यांचा मुलगा डॉ. योगेश आणि सून डॉ. सारिका क्षीरसागरही सक्रिय झाल्या आहेत.
परळी-मुंडे बहीण-भाऊ आता एकत्र
गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडचे नाव देशात चमकले. त्यांची मोठी मुलगी पंकजा मुंडे या ग्रामविकासमंत्री राहिल्या असून, सध्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यासोबतच डॉ. प्रीतम मुंडे यादेखील सलग दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे हेदेखील पालकमंत्री आहेत. या कुटुंबातील तिसरी पिढी आणखी सक्रिय नाही.