एक दुजे के लिए; पत्नी निधनाच्या धक्क्याने पतीनेही सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 01:34 PM2021-01-16T13:34:02+5:302021-01-16T13:35:42+5:30
शेख रहिम हे धारूरमधील शहरातील नामांकित व्यापारी होते.
धारूर: येथील अजीजपुरा भागात राहणाऱ्या एका दाम्पंत्याचे एकाचवेळी निधन झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाल्याचे कळताच पतीला हा धक्का सहन झाला नाही. यातच त्यांना हृयाविकाराचा धक्का आल्याने त्यांचाही त्याच वेळी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहर हळहळले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धारुर शहरातील शेख रहिम शेख लाल यांच्या पत्नी हसीना (54) यांना उपचारासाठी लातूर येथील खाजगी दवाखान्यात चार दिवसांपुर्वी दाखल करण्यात आले होते. त्यांचे उपचार सुरु असताना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. यावेळी दवाखान्यात उपस्थित असलेले पती शेख रहिम (58) यांना पत्नीचे निधन झाल्याचे कळताच ते अस्वस्थ झाले. पत्नीवर नितांत प्रेम असणाऱ्या रहिम यांना हे वृत्त सहन न झाल्याने हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. या धक्क्यात त्यांची तत्क्षणी प्राणज्योत मावळली.
शेख रहिम हे शहरातील नामांकित व्यापारी होते. मितभाषी स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. शहरात प्रथमच अशी हृदयद्रावक घटना घडली असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी सकाळी 11.30 वाजता मयत दाम्पंत्यावर धारुर शहरातील तहसील कार्यालयासमोरील तकीया तलाव परिसरातील कब्रस्तानमध्ये शेकडोंच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला.