वाळूचा वाद! आधी तहसीलदारांची माफियांविरोधात तक्रार;आता त्यांच्याविरोधात महिलांची फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 06:46 PM2022-02-19T18:46:18+5:302022-02-19T18:46:40+5:30

दोन्ही घटनेने खळबळ उडाली असून आता वाळूचा वाद घरापर्यंत गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Earlier, tehsildars had registered a case against sand mafias, now women have filed a complaint against them | वाळूचा वाद! आधी तहसीलदारांची माफियांविरोधात तक्रार;आता त्यांच्याविरोधात महिलांची फिर्याद

वाळूचा वाद! आधी तहसीलदारांची माफियांविरोधात तक्रार;आता त्यांच्याविरोधात महिलांची फिर्याद

Next

गेवराई : घरात घुसून महिलांना धमकावल्या प्रकरणी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींवर गेवराई पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सचिन खाडे यांना गुरुवारी वाळू माफियांनी धमकावले व कार्यालयात जाण्यापासून रोखले होते. त्यानंतर तहसीलदार खाडे यांनी देखील फिर्याद दिली आहे. या दोन्ही घटनेने खळबळ उडाली असून आता वाळूचा वाद घरापर्यंत गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

या विषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक १७ रोजी काही ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू घेऊन जात असल्याची माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना मिळाली होती. यावरून तहसीलदारांनी महसूल कर्मचाऱ्यांना पाठवून त्यांच्यावर कारवाई केली. परंतू, त्यानंतर सायंकाळच्या सुमारास तहसीलदार यांना बघून घेतो, अशी धमकी वाळूमाफियांनी दिली. याप्रकरणी तहसीलदारांनी गेवराई पोलिस ठाण्यात सोमनाथ गिरगे व अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. 

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कुसूम शिवाजी मोटे, स्वाती सोमनाथ गिरगे, सुनीता सुरेश भुंबे (सर्व रा.गेवराई) या महिलांनी तहसीलदार व अन्य सहा ते सात जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तिन्ही महिलांच्या तक्रारीनुसार, तहसीलदार सचिन खाडे हे सहा ते सात जणांना सोबत घेऊन घरी आले. गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरातील कोणत्याही व्यक्तींची परवानगी न घेता घरात प्रवेश केला. महिलांना तुम्ही वाळू प्रकरणातील आरोपी लपवून ठेवले, असे म्हणत धमकावले, असे नमूद केले आहे. याप्रकरणी तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा ते सात जणांविरोधात शुक्रवारी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि.संदीप काळे हे करत आहेत.
 
२ दिवसांपूर्वी वाळू माफियांनी तहसिलदारांना धमकावले होते 
तहसीलदार सचिन खाडे यांना सोमनाथ गिरगे यासह अन्य दोन वाळू माफियांनी गुरुवारी घरी जाऊन धमकावले होते. तहसिलला जाण्यापासून अडविले. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा गुरुवारी दाखल झाला. या घटनेनंतर शुक्रवारी एकाच दिवशी तीन महिलांनी तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरोधात तक्रारी दिल्या. दरम्यान, या प्रकरणात वाळू माफियांचा हात असल्याची जोरदार चर्चा होत आहे. तर या प्रकरणी तहसीलदार सचीन खाडे यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. 

Web Title: Earlier, tehsildars had registered a case against sand mafias, now women have filed a complaint against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.