बाळू खाकाळ खून प्रकरण; पाच जणांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:39 AM2019-03-20T00:39:08+5:302019-03-20T00:41:16+5:30
आष्टी तालुक्यातील केरुळ येथील बहूचर्चित रवींद्र उर्फ बाळू खाकाळ खून प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला. यामध्ये पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर इतर १२ आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.
बीड : आष्टी तालुक्यातील केरुळ येथील बहूचर्चित रवींद्र उर्फ बाळू खाकाळ खून प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला. यामध्ये पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर इतर १२ आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे तथा अतिरिक्त सत्र न्या.ए.एस. गांधी यांनी दिला.
सचिन विठ्ठल सुर्यवंशी (३२ रा.केरूळ ता.आष्टी), सय्यद गौस सय्यद नूर (२८, रा.अहमदनगर), भाऊसाहेब मोहन साबळे (३६ रा.केरूळ ता.आष्टी), महेंद्र सेवकराम महाजन (२८ रा.केरूळ ता.आष्टी) व नितीन संजय शिंदे (३० रा.जेऊर ता.अहमदनगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजकीय वैमनस्यातून ११ आॅक्टोबर २०११ रोजी केरुळ (ता. आष्टी) येथे रवीद्र उर्फ बाळू दशरथ खाकाळ (रा. खाकाळवाडी ता. आष्टी) यांची यात्रेत तलवारीचे वार करुन हत्या करण्यात आली होती. घटनेच्या आधी काही महिन्यांपूर्वी खाकाळवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत सचिन सूर्यवंशी व रवींद्र खाकाळ यांचे पॅनल आमने- सामने होते. या निवडणुकीत खाकाळ गटाने विजय संपादन केला होता. रवींद्र खाकाळ यांच्या पत्नी पुष्पा खाकाळ यांची सरपंचपदी वर्णी लागली होती. याच दरम्यान दोन गटातील वाद आष्टी ठाण्यात पोहोचला होता. तेव्हा परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हे नोंद झाले होते. दोन गटातील राजकीय वाद नंतर विकोपाला गेला. रवींद्र खाकाळ हे केरुळ येथे बहिणीच्या गावी टेंभी देवीच्या यात्रेला गेले होते. ११ आॅक्टोबर २०११ रोजी देवीचे दर्शन घेऊन बहिणीच्या घराकडे जाताना जीपमधून आलेल्या मारेकऱ्यांनी बाळु यांच्यावर तलवारीने २९ वार केले होते. यात ते जागीच ठार झाले. यावेळी मारेकऱ्यांनी रवींद्र खाकाळ यांचा भाचा प्रवीण गोंदकर तसेच शाकेर शेख, सचिन गिरे, अरुण ओव्हाळ यांनाही लोखंडी गज व पाईपने मारहाण केली होती. शिवाय प्रवीण गोंदकर व शाकेर शेख यांच्या दिशेने गोळीबारही केला होता. सुदैवाने ते बचावले. प्रवीण गोंदकर यांच्या तक्रारीवरुन सचिन सूर्यवंशी (रा. केरुळ), नितीन कदम (रा. जेऊर जि. सोलापूर), मोहम्मद गौस नूर (रा. नगर), अशोक फल्ले, कृष्णा क्षीरसागर, महेंद्र महाजन (तिघे रा. केरुळ) यांच्यासह अनोळखी ५ जणांवर आष्टी ठाण्यात गुरन १४९/११ कलम ३०२, ३०७, १४७, १४८, २/२५ व ३/२५ आर्म अॅक्ट नुसार गुन्हा नोंद झाला होता. सुरुवातीला तत्कालीन उपअधीक्षक ज्योती क्षीरसागर व नंतर अप्पर अधीक्षक अखिलेश सिंह यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
तपासादरम्यान आणखी आरोपींचा यात समावेश झाला होता. मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे तथा अतिरिक्त सत्र न्या.ए.एस. गांधी यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. यामध्ये ५ जणांना जन्मठेप, प्रत्येकी २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. पाच जणांचे आलेले १ लाख रूपये हे मयत खाकाळ यांच्या पत्नीला द्यावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
१२ जणांची निर्दोष मुक्तता
या गुन्ह्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरुन आष्टी ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक राजाराम माने यांना सहआरोपी केले होते. घटनेपासून ते कारागृहात होते.
तीन महिन्यांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यांच्यासह शेख आदम शेख अकबर (रा. रांजणगाव), दिनेश विठ्ठल केकाण, कृष्णा मोहन साबळे, दादासाहेब हरिभाऊ फल्ले, संदीप मुरलीधर काळे, अशोक हरिभाऊ फल्ले (सर्व रा. केरुळ) यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्याआधी दोघांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. कृष्णा क्षीरसागर हा अद्यापही फरार आहे.
- मंत्रालयातून वकिलांची नियुक्ती
- या प्रकरणातील फिर्यादी प्रवीण गोंदकर यांनी या प्रकरणासाठी विधी व न्याय मंत्रालयात धाव घेत सरकारी वकील अॅड.सय्यद अझहर अली यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियूक्ती करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर अॅड.अली यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियूक्ती केली होती. अॅड. शेख सादेक, अॅड. सय्यद जोहेब अली, अॅड. अरूण जगताप, अॅड.शेख असलम, पैरवीअधिकारी सफौ डोंगरे व शेख करीम यांनी अॅड.अली यांना सहकार्य केले.