होळीसाठी पौंडूळ, कोल्हेरच्या ग्रामस्थांनी बाजारात आणले पर्यावरणपूरक रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:01 AM2019-03-19T01:01:49+5:302019-03-19T01:02:53+5:30
रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जण आजाराला सामोरे जातात. प्रदूषणमुक्त होळी खेळण्यासाठी आता कल वाढत आहे. इकोफ्रेंडली होळीचा संदेश विविध पातळीवरुन सामाजिक संघटना आणि संस्था तसेच व्यक्तीगत पातळीवर लोक देत आहेत.
अनिल भंडारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जण आजाराला सामोरे जातात. प्रदूषणमुक्त होळी खेळण्यासाठी आता कल वाढत आहे. इकोफ्रेंडली होळीचा संदेश विविध पातळीवरुन सामाजिक संघटना आणि संस्था तसेच व्यक्तीगत पातळीवर लोक देत आहेत. रंगांच्या या दुनियेत बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील पौंडुळ आणि गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथील ग्रामविकास समितीने २०० किलो नैसर्गिक रंग बनवून बाजारात निसर्गप्रेमींसाठी आणले आहेत. हे रंग बंगळूरु, पुणे आणि मुंबईतही निसर्गप्रेमी वापरणार आहेत.
श्रीक्षेत्र नारायणगडाजवळ असणाऱ्या तलावामुळे पौंडुळ गाव तीन गटात विभागले आहे. शंभर- दीडशे उंबºयाचे गाव असलेल्या पौंडुळ नं. ३ मध्ये मागील आठ- दहा वर्षांपासून ग्रामविकास समिती कार्यरत आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत रोजगार मिळावा या उद्देशाने नैसर्गिक रंगाचा उपक्रम ग्रामविकास गतिविधी देवगिरी प्रांतने सुचविला.
पौंडुळ व कोल्हेर येथील समित्यांमध्ये एकूण ४० जण सदस्य आहेत. मात्र या उपक्रमात दोन्ही ठिंकाणचे पाच- पाच कुटुंब सहभागी झाले आहेत. घरातील महिला, पुरुषांबरोबरच बच्चे कंपनी या रंगकामात व्यस्त आहे. विशेषत: महिलांनी रंग निर्मिती व पुरुषांनी मार्केटिंग करायची असे हे सूत्र आहे. पौंडुळ येथे १०० किलो तर कोल्हेर येथे १०० किलो रंग बनविले जात आहे.
विशेष म्हणजे यात सहभागी कुटुंबांनी भांडवली खर्चाची जबाबदारी पेलली आहे. प्रती कुटुंब साधारण दोन हजार रुपये खर्च आला.गुंतवणुकीच्या तुलनेत परतावाही चांगला मिळू शकतो, याचे गणित पक्के बनले आहे. पर्यावरणपूरक रंगाचा वापर आरोग्याच्या दृष्टीने हितावह असल्याने या रंगांना चांगली मागणी आहे.
अपायकारक नाही
स्टार्च पावडर, खाण्यासाठी वापरले जाणारे रंग व पाणी आणि कापडाचा वापर या प्रक्रियेत करावा लागतो. हा रंग लावताना तोंडात गेला किंवा जिभेवर विरघळला तरी कुठलाही अपाय होत नाही, हे विशेष.
असा करतात रंग तयार
खाण्याचा रंग पाण्यात विरघळतात, त्यानंतर स्टार्च पावडर टाकून ओली केली जाते. नंतर वाळविला जातो. वाळल्यानंतर वस्त्रगाळ करुन रंग तयार केला जातो.