वाळू जप्तीच्या कारवाईतील बोट नष्ट करण्यात ‘अर्थकारण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:15 AM2018-01-16T00:15:50+5:302018-01-16T00:18:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तलवाडा : तालुक्यातील राजापूर येथे अवैध वाळू उपसा करणाºयांवर शनिवारी कारवाई करून महसूल व पोलिसांनी बोट, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तलवाडा : तालुक्यातील राजापूर येथे अवैध वाळू उपसा करणाºयांवर शनिवारी कारवाई करून महसूल व पोलिसांनी बोट, पोकलेन व दुचाकी जप्त केल्या होत्या. यातील बोट नष्ट करण्याच्या हालचाली रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या, परंतु सोमवारी सकाळी सर्व चित्र बदलले. बोट नष्ट करण्यासाठी महसूल व पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखवून कारवाईस आखडता हात घेतल्याने या कारवाईत ‘अर्थकारण’ झाल्याची चर्चा परिसरात आहे.
मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाळू उपशावर कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. या कारवाईत जप्त केलेली बोट नष्ट करण्यासाठी महसूल व पोलीस रविवारी दिवसभर जिलेटीन शोधत फिरत होते. जिलेटीन मिळाल्यानंतर बोट नष्ट करण्यासाठी कारणे दाखविण्यात आली. रात्री उशिरा नष्टची कारवाई केली जाईल, असे संबंधितांनी सांगितले होते, परंतु सोमवारी बोटवर गुन्हा दाखल असल्याने ती नष्ट करता येणार नाही, असा खुलासा पोलिसांनी दिला तर पोलीस बोट नष्ट करीत नसल्याचे महसूल विभागाने सांगितले. या दोघांनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकल्याने संताप व्यक्त होत आहे. हे दोन्ही विभाग संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.