बीड जिल्ह्यात क्रांती मोर्चाला ठिय्या आंदोलनाची धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:27 AM2018-07-20T00:27:08+5:302018-07-20T00:27:18+5:30
बीड : आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तुळजापूरनंतर बुधवारी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर अचानक ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसत तहसील कार्यालयाच्या परिसरात मोर्चेकऱ्यांनी दुपारपासून सुरु केलेले ठिय्या आंदोलन गुरुवारी दुसºया दिवशीही सुरुच होते. तर नोकरभरतीत १६ टक्के आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर विश्वास नसल्याचे सांगत आंदोलन सुरुच होते.
मराठा क्रांती मोर्चाच्या परळीतील या आंदोलनास गुरूवारी बीड, अंबाजोगाई, परळी, परभणी येथील विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देवून पाठींबा जाहीर केला आहे. गुरूवारी सकाळपासून तहसीलसमोर शासनाच्या विरोधात व आरक्षण मिळावे यासाठी आंदोलकांची घोषणाबाजी सुरु होती.
मराठा क्रांती मोर्चानंतर सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटणे सुरू आहे. गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोकरभरतीत १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला असल्याचे घोषित केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतरही आंदोलक समाधानी झाले नाहीत. गुरूवारी सायंकाळी परळी तहसीलसमोर ठिय्या आंदोलन चालूच होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आमचा विश्वास नाही असे मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन चालूच राहील असेही पाटील यांनी गुरूवारी सांगितले.
बुधवारी रात्री परळी व परिसरातील काही कार्यकर्त्यांनी भाकरी व पिठल्याचे नियोजन करून आंदोलकांच्या जेवणाची सोय केली. सकाळी चहा पाणी झाले व गुरूवारी दुपारी तहसीलजवळच आंदोलनाच्या ठिकाणी स्वयंपाक गृह तयार केले.
या आंदोलनाला पाठिंबा देणारे अनेक संदेश विविध भागातून येत होते. पावसाळी वातावरणाचा त्रास सहन करीत हे आंदोलन जोमाने चालू होते. सकाळपासून आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा चालूच होत्या. गुरूवारी दिवसभर विविध पक्षाच्या पदाधिकाºयांनी भेटी देवून मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठींबा जाहीर केला आहे.
बुधवारी रात्री दहाच्या नंतर गणेशानंद महाराज यांचे आंदोलनाच्या ठिकाणी किर्तन झाले. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी तबल्याची साथ दिली. त्यानंतर जागर गोंधळाचा कार्यक्रम झाला.
बुधवारची रात्र आंदोलकांनी जागून काढली. पिण्याच्या पाण्यासाठी तहसील परिसरात टँकरची सोय केली होती. तसेच अग्नीशामक दल व रूग्णवाहिकाही या परिसरात ठेवण्यात आलेली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सदरील आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरु
होते.
बीडमध्ये कलेक्टर कचेरीसमोर पाच तास ठिय्या
बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळपासून शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, समाजबांधव जमा झाले. परळीतील आंदोलनाला पाठिंबा देत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. शासनाच्या भूमिकेबद्दल यावेळी घोषणाबाजी झाली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव पंडीत, प्रकाश कवठेकर, अनिल जगताप, राजेंद्र मस्के, संदीप क्षीरसागर, सचिन मुळुक, अॅड. हेमा पिंपळे, शैलेश जाधव, कुंडलिक खांडे, कमलताई निंबाळकर, राहुल वायकर, कुंदाताई काळे, सुहास पाटील, रमेश चव्हाण, महेश धांडे, विठ्ठल बहिर, राजेंद्र आमटे, गंगाधर काळकुटे, पिंटू पोकळे, युवराज जगताप, रणजित बनसोडे,वकील बांधव आदींसह मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाºयांनी भेटी देऊन आंदोलनाला समर्थन व बळ दिले.
वडवणीत रास्ता रोको
वडवणी येथील शिवाजी चौक तसेच तालुक्यातील कुप्पा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी झाली. वडवणीत एक तास तर कुप्पा येथे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला.
बसचे नुकसान
माजलगाव : मोर्चास पाठिंबा म्हणून तालुक्यातील टालेवाडीफाटा येथे आंदोलन सुरु होते. गुरुवारी दुपारी १२ वाजता आंदोलकांनी परळीहून माजलगावकडे जात असलेल्या परळी - माजलगाव (एम.एच. २० बीएल १५२१) या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. तत्पूर्वी प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आले. सदरील बसचे किरकोळ नुकसान झाले असून, दिंद्रुड पोलिसांनी अज्ञात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
धारूर तहसीलमध्ये ठिय्या
परळी येथे सुरु असलेल्या ठोक मोर्चा आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकल मराठा युवक संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अतुल शिनगारे नाना जगताप अंनता भोसले सचिन थोरात दादासाहेब चव्हाण सुरेश खेपकर संदेश उंखडे गणेश सांवत नितीन शिनगारे अविनाश ठोंबरे गणेश थोरात विश्वासा शिनगारे बापूसाहेब खामकर ईश्वर खामकर सचिन थोरात विजय शिनगारे आदी सहभागी होते.