प्रवेश फिसच्या नावे पालकांची लुट; आमदारांनीच केले स्टिंग ऑपरेशन, शिक्षक ताब्यात,रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:46 PM2022-06-14T18:46:12+5:302022-06-14T18:46:41+5:30
माजलगावात सिद्धेश्वर विद्यालयाचे कर्मचारी प्रवेश फीसच्या नावाखाली पालकांची लूट करताना पकडले
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) : शहरात विद्यार्थ्यांची अडवणूक करून फिसच्या नावाखाली लूट करत असल्याची नेहमीच ओरड असणाऱ्या सिद्धेश्वर विद्यालयाचे तीन कर्मचारी पालकांकडून प्रवेशाच्या नावावर लुट करत असल्याचा प्रकार उघड झाला. येथील वैष्णवी मंगल कार्यालय येथे सुरू असलेला शिक्षणाचा बाजार स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी,पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना सोबत घेऊन स्टिंग ऑपरेशन द्वारे उघडकीस आणला. यावेळी प्रवेश फिसच्या नावाखाली घेतलेली १ लाख ७६ हजार रोकड जप्त करण्यात आली. नामांकित शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कृत्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
येथील सिध्देश्वर शिक्षण संकुलात स्थानिक कार्यकारणीकडून नेहमीच प्रवेश फिसच्या नावाखाली पालकांची लूट करण्यात येत असल्याची ओरड होत असते. प्रहार संघटनेचे गोपाल पैजने यांनी याबाबत शिक्षण विभागाकडे अनेक वेळा तक्रार करून देखील याची दखल घेतली नव्हती. दरम्यान, आज मंगळवार रोजी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात पालकांना बोलावून विविध वर्गाच्या सेमी इंग्लिशच्या प्रवेशासाठी पालकांकडून 20-25 हजार रुपये फिस घेऊन प्रवेश देण्यात येत होते. या प्रकाराची तक्रार आ. प्रकाश सोळंके यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर आ. सोळंके यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे , गटशिक्षणाधिकारी एल.बी.बेडसकर यांना सोबत घेऊन वैष्णवी मंगल कार्यालय येथे स्टिंग ऑपरेशन केले.
या ठिकाणी पालकांकडून कर्मचाऱ्यांना मार्फत रोख रक्कम घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून पोलिसांनी १ लाख ७६ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. दरम्यान, या प्रकाराने संस्थेत गेल्या कित्येक वर्षापासून चाललेला अनागोंदी कारभार समोर आला आहे. यावेळी शिक्षक ढगे, आदमने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन शिक्षक फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, चार वाजेपर्यंत पालकांची जवाब नोंदविण्याचे काम सुरू होते. या जबाबावरून संबंधित दोन्ही शिक्षकांना माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आणून गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली.