खोट्या तक्रारी करून बीड जिल्हा रुग्णालयात वरिष्ठांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:43 PM2019-12-31T13:43:21+5:302019-12-31T13:47:17+5:30
जिल्हा रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेने काढले पत्रक
बीड : जिल्हा रुग्णायलात ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माघार घेतल्याचेही समोर आले होते. आता यात परिचारीका संघटनेनेही उडी घेतली आहे. या वादामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन होत चालल्याचे सांगत त्यांनी वरिष्ठांविरोधात खोट्या तक्रारी करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात असल्याचे पत्रक सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेने प्रसिद्धीसाठी काढले आहे.
जिल्हा रुग्णालय मागील आठ दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. वरिष्ठ विरूद्ध कनिष्ठ असा वाद निर्माण झाला आहे. ड्यूटी व रजेच्या कारणांसह विविध आरोप करणारी तक्रार करणाऱ्यांपैकी जवळपास ८ ते ९ डॉक्टरांनी माघारही घेतल्याचे समजते आहे. तक्रारदार डॉक्टरांनी याबाबत दोन दिवसांपूर्वी आ.धनंजय मुंडे यांचीही भेट घेतली होती. या प्रकरणाची चर्चा सर्वत्र झाल्याचे सांगत सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेने प्रसिद्धीसाठी पत्रक काढले आहे.
या वादामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन होत चालली आहे. नागरिकांचा आरोग्य विभागाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत असून आरोग्ये सेवेवरही परिणाम होत आहे. ठराविक डॉक्टरांनी केलेली तक्रार करून वरिष्ठांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच कामात हलगर्जीपणा करण्यासाठी हा खेळ खेळला जात असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. तसेच परिचारीकांना वरिष्ठांनी वेळोवेळी सहकार्य केले असून आमची त्यांच्या विरोधात कसलीही तक्रार नसल्याचे सांगत वरिष्ठांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. या निवेदनावर अध्यक्ष संगिता दिंडकर, उपाध्यक्ष जयश्री उबाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज्याध्यक्ष सत्वशिला मुंडे, राजेंद्र औसरमल, सचिव मंदाकिनी खैरमोडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे लेटरहेडवर नावे आहेत.
दबाव टाकल्याचा आरोप?
११ पैकी ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला तक्रारीची मुळ प्रत न दाखविता स्वाक्षऱ्या घेतल्याचे सांगत यातून माघार घेतल्याचे समजते. वास्तविक पाहता, वर्ग २ च्या पदावर असताना प्रत न वाचता स्वाक्षऱ्या करण्याचे कारण न पटणारे आहे. यात राहिलेल्या तीन डॉक्टरांनी तक्रारदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यावर थेट प्रतिक्रिया देण्यास मात्र, त्यांनी नकार दिला.