अहो आश्चर्यम्! तब्बल आठ पोळ्यांचे मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 04:56 AM2021-02-09T04:56:30+5:302021-02-09T04:56:44+5:30
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतातील प्रकार
- नितीन कांबळे
कडा (जि. बीड) : आजवर एक पोळी असलेले मोहोळ झाडावर किंवा इतर ठिकाणी आपण पाहिले असेल. मात्र, आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतकरी महादेव सर्जेराव घुले यांच्या कांद्याच्या शेतातील मातीच्या माठात एक नव्हे तर तब्बल आठ पोळे असलेले मोहोळ आढळून आले आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतकरी महादेव घुले यांचे गावापासून जवळच शेत आहे. शेतात जनावरे व शेळ्यांसाठी घास केला आहे. कांद्याच्या शेतात एक मातीचा माठ ठेवलेला होता. पण जेव्हा हा माठ उचलून फेकायची वेळ आली, तेव्हा या मातीच्या माठात आजवर कधीच दिसले नाही की कुठे नजरेसही पडले नाही, असे आठ पोळ्यांचे मोहोळ आढळून आल्याने आश्चर्याचा विषय बनला आहे.
साडेतीन किलो मध
लाॅकडाऊनच्या काळात शेतात आम्ही पाणी पिण्यासाठी माठ आणून ठेवला. नंतर तिकडे दुर्लक्ष झाले. पण आता कांदे काढताना तो माठ पाहिला तर मोहळ होते.
धूर करून उठवले असता आठ पोळ्यांचे मोहोळ साडेतीन किलो मधाने भरलेले दिसले. हे पाहून आश्चर्य वाटल्याचे शेतकरी महादेव घुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.