स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात मराठवाड्यातील आठ बसस्थानके उत्कृष्ट
By अनिल भंडारी | Published: February 12, 2024 07:10 PM2024-02-12T19:10:59+5:302024-02-12T19:11:14+5:30
प्रवाशांना दररोज स्वच्छ, सुंदर स्थानकातून व बसमधून प्रवास करता यावा या हेतूने गत नऊ महिन्यांपासून हे अभियान सुरू होते.
बीड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात ११७ पैकी आठ बसस्थानके उत्कृष्ट ठरली आहेत. मे ते डिसेंबर २०२३ दरम्यान झालेल्या मूल्यांकनातून या बसस्थानकांनी बाजी मारल्याचे दिसून आले.
प्रवाशांना दररोज स्वच्छ, सुंदर स्थानकातून व बसमधून प्रवास करता यावा या हेतूने गत नऊ महिन्यांपासून हे अभियान सुरू होते. या अंतर्गत तीन सर्वेक्षण करण्यात आली. मे ते डिसेंबर २०२३ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून विविध समित्यांमार्फत बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार छ. संभाजीनगर प्रादेशिक विभागात वर्ग अ मध्ये असलेल्या २५ बसस्थानकांमधून रापमच्या बीड विभागातून अंबाजोगाई बसस्थानक अव्वल ठरले, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील वैजापूर तसेच लातूर विभागातील निलंगा बसस्थानकांना द्वितीय क्रमांक मिळाला. तृतीय क्रमांक एकाही स्थानकाला मिळू शकला नाही.
वर्ग ब मध्ये ३३ बसस्थानकांचा समावेश होता. यात जालना विभागातील अंबड स्थानकाने प्रथम, परभणी विभागातील हिंगोलीने द्वितीय, तर लातूर विभागातील लातूर बसस्थानकाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. वर्ग क मध्ये ५९ बसस्थानकांचा समावेश होता. यातील नांदेड विभागातील भोकर स्थानकाने प्रथम, तर धर्माबाद स्थानकाने द्वितीय क्रमांक मिळविला. या गटात तृतीय क्रमांक एकाही स्थानकाला मिळाला नाही.
बसस्थानकांना असे मिळाले गुण
वर्ग अ १) अंबाजोगाई ७४- २) वैजापूर ७१, निलंगा ७१ - ३) निरंक
वर्ग ब १) अंबड ८० - २) हिंगोली- ७२- ३) लातूर ७१
वर्ग क १) भोकर ७२- २) धर्माबाद ७०- ३) निरंक
११७ बसस्थानकांची तपासणी
स्वच्छतेबाबत बसस्थानक, परिसर आणि स्वच्छतागृहांसाठी ५० गुण होते. बस स्वच्छता आणि प्रवासी अभियानासाठी २५ व इतर असे एकूण १०० गुण होते. ५० पेक्षा कमी गुणांसाठी वाईट, ५० ते ७० गुणांसाठी मध्यम अणि ७० पेक्षा जास्त गुणांसाठी चांगले असे मूल्यमापनाचे वर्गीकरण करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर विभागातील ११७ बसस्थानकांची तपासणी या अभियानातून करण्यात आली.