आठ फूट लांब धामिनीचा बीड जिल्हा रुग्णालयात मुक्तसंचार; सर्पमित्रांनी कुशलतेने मिळवला ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 13:41 IST2020-04-30T13:40:34+5:302020-04-30T13:41:40+5:30
घटना बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास औषधी वाटपाच्या ठिकाणी घडली.

आठ फूट लांब धामिनीचा बीड जिल्हा रुग्णालयात मुक्तसंचार; सर्पमित्रांनी कुशलतेने मिळवला ताबा
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात तब्बल आठ फुट लांब असलेली धामिन (सापाची एक जात) निघाली. ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास औषधी वाटपाच्या ठिकाणी घडली. त्यानंतर सर्पमित्रांना बोलावण्यात आले. त्यांनी ती धामिन अलगत पकडली.
जिल्हा रुग्णालयाच्या बाजुने सर्वत्र अस्वच्छता आहे. तसेच झाडाझुडपांचा विळखा आहे. याच ठिकाणी धामिन, साप वास्तव्यास असतात. बुधवार सायंकाळी साडे चार वाजता ओपीडी सुरू होते. त्याच अनुषंगाने कर्मचारी रुग्णालयात येत होते. एवढ्यात जुना आयुष विभागाच्या तेथील शौचायालतून आठ फुट लांब आणि काळ्या रंगाची धामिन बाहेर येत ती औषधी विभागात गेली. हा प्रकार कक्षसेवकांनी पाहिला. त्यांनी तात्काळ सर्पमित्रांना संपर्क केला. त्याप्रमाणे उंकेश सवाई, बालाजी गुरखुदे, संदीप सवाई यांनी धाव घेत तिचा शोध घेऊन तिला अलगद पकडले. एवढ्या मोठा साप निघाल्याचे पाहून रुग्णालयीन कर्मचारी, रुग्ण चांगलेच घाबरले होते. तो पकडल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
काय म्हणतात सर्पमित्र
ही धामिन बिनविषारी असते. एप्रिल, मे महिना हा मिलनचा समजला जातो. धामिन जातीची मादी एका विशीष्ट प्रकारचा गंध सोडते. याला आकर्षित होऊन इतर नर तिच्या मागे येतात. सध्या या जातीचे साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात. परंतू हे बिनविषारी असल्याचे सर्पमित्र सांगतात.