अपघातात देवदर्शनासाठी जाणारे आठ जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:00 AM2019-11-12T00:00:36+5:302019-11-12T00:01:05+5:30
जीपने देवदर्शनासाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही परिसरात उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगातील जीपने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाटोदा (जि. बीड) : जीपने देवदर्शनासाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही परिसरात उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगातील जीपने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जण जागीच ठार झाले तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दहाच्या सुमारास घडली.
बीड तालुक्यातील निवडुंगवाडी व तांदळ््याचीवाडी येथील मुंडे व तांदळे कुटुंबीय देवदर्शनासाठी जात होते. पाटोदा तालुक्यातील बेलखंडी पाटोदा व सौताडा येथे ते देवदर्शनासाठी जाणार होते अशी माहिती आहे. दरम्यान त्यांची जीप (क्र. एमएच २३ एएस ३४७०) वैद्यकिन्ही भागात आल्यानंतर एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रक (क्र. एमएच १२ एलटी ७०८६) ला पाठिमागून भरधाव वेगात धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की या जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर, दवाखान्यात उपचारासाठी रुग्णालयात येत असताना दोघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान या अपघातात चालक सतीश बभीमराव मुंडे व लहान मुलगी सई सतीश मुंडे हे जखमी आहेत. गंभीर जखमी असलेल्या सई हिला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे.
हा अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना गाडीचा पत्रा कापून बाहेर काढले होते. यात जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान पाटोदा पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होते. पाटोदा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मयतांची नावे
या अपघातात जीपमधील वैजनाथ ज्ञानोबा तांदळे (४५), बाळू पंढरीनाथ मुंडे (४१), अशोक गबरु मुंडे (२८), केसरबाई बन्सी मुंडे (५६), आसराबाई भीमराव मुंडे (६०), शरद बन्सी मुंडे, जयश्री मुंडे व अल्पवयीन मुलगा सोहम सतीश मुंडे हे ८ जण ठार झाले आहेत.