एकता मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:02 AM2021-02-21T05:02:12+5:302021-02-21T05:02:12+5:30
पाच ठराव मंजूर : कवी संमेलनाने आणली रंगत लोकमत न्यूज नेटवर्क शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य ...
पाच ठराव मंजूर : कवी संमेलनाने आणली रंगत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर येथे तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला. दोन दिवसांच्या या संमेलनामुळे साहित्यप्रेमी रसिकांना आणि तालुक्यातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.
‘कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण’ या विषयावरील परिसंवादात प्रा. डॉ. सुधीर येवले आणि विषयतज्ज्ञ संध्या कुलकर्णी यांनी विचार मांडले. त्यानंतर ग्रामीण कथाकार भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन कार्यक्रमात संगिता होळकर-औटी यांच्यासह बालकथाकार पूजा सुरसे, ऋतुजा खेडकर, सोफियान पठाण यांनी सहभाग घेतला. दुपारी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमात शाहीर अनिलसिंह तिवारी आणि नकलाकार घोडके यांनी चांगलीच धमाल उडवून दिली. तर रेणुका विद्यालय, मानूर, घाटशिळा विद्यालय, घाटशीळ पारगाव, दहिफळे वस्तीशाळेच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेले.
नवोदित आणि अनुभवी कवींनी एकाहून एक कविता सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी माधव सावंत होते. यावेळी लक्ष्मण खेडकर, प्रा. डॉ. अशोक घोळवे, श्रावण गिरी, दीपक महाले, संदीप काळे, प्रा. डॉ. विठ्ठल जाधव, सुरेखा येवले, युवराज वायभासे, श्रीराम गिरी, केशव कुकडे, इम्रान शेख, मनिषा लबडे, जया कुलथे, देविदास शिंदे, अविनाश बुटे, अजिनाथ ठोंबरे, द. ल. वारे, महेश मगर, भाऊसाहेब नेटके, सुनील केकाण, सचिन अभंग, राजेंद्र लाड, संगीता होळकर, मधुकर केदार, राहुल ससाणे, नीलेश दौंड, अण्णासाहेब तहकिक, शहादेव सुरासे, संध्याराणी कोल्हे, नानासाहेब खरात, शहारुख लखाणे, संजय राठोड, सानिका खेडकर, आकांक्षा सोनवणे, अनघा कुलकर्णी, संस्कृती बडे यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन के. बी. शेख यांनी केले.
साहित्य संमेलनातील ठराव
या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेत अनिवार्य करावे, शासकीय कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी मराठी भाषेतच आपली स्वाक्षरी करावी, भाषा संवर्धनासाठी वरिष्ठ स्तरावरून विविध उपक्रमांचे आयोजन करावे, मानूर येथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असलेल्या शिल्पकृतीचे पुरातत्व विभागाने संवर्धन करावे, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने शिरुर शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांना आणि उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाणपोईची उभारणी करावी, असे पाच ठराव मंजूर करण्यात आले.
‘अंतरीचे धावे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कवी संमेलन सत्रात प्रसिद्ध कवी श्रावण गिरी यांच्या ‘अंतरीचे धावे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन टिचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवी संमेलनाध्यक्ष माधव सावंत, ग्रामीण कथाकार भास्कर बडे, अनंत कराड, गोकुळ पवार उपस्थित होते.