गुणवता रक्षणासाठी आबालवृध्दांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:04 AM2019-09-01T00:04:50+5:302019-09-01T00:06:02+5:30
शनिवारी बीडमध्ये अनारक्षितांचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. कुठल्याही जातीला, कोणाच्या आरक्षणाला विरोध न करता केवळ गुणवत्तेच्या रक्षणासाठी काढण्यात आलेला शहराच्या इतिहासातील हा अभूतपूर्व, ऐतिहासिक मोर्चा ठरला. उत्स्फूर्त सहभाग
बीड : अतिआरक्षण देशाचे भक्षण, वेळीच नाही घातला आळा तर देशाचा होईल खुळखुळा, गुणवत्ता वाचवा देश वाचवा, हमें न्याय चाहिए, खैरात नहीं, राष्टÑ की पहचान योग्यता है, आरक्षण नहीं असे घोषफलक हाती घेत शनिवारी बीडमध्ये अनारक्षितांचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. कुठल्याही जातीला, कोणाच्या आरक्षणाला विरोध न करता केवळ गुणवत्तेच्या रक्षणासाठी काढण्यात आलेला शहराच्या इतिहासातील हा अभूतपूर्व, ऐतिहासिक मोर्चा ठरला.
उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्रात सध्या आरक्षणाची टक्केवारी ७५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. अत्याधिक आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील शिक्षणाच्या प्रगतीची दारे बंद होत आहेत. भावी पिढीचे भविष्य अंधकारमय होत आहे. भावी पिढीच्या भविष्यासाठी काढलेल्या मोर्चात अनारक्षित प्रवर्गातील सर्व समुहातील आबालवृद्ध शिक्षक, वकील, अभियंता, डॉक्टर, व्यापारी तसेच बुद्धिजीवी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मोर्चात उस्फूर्त सहभाग नोंदविला.
शनिवारी सकाळी साडेसात वाजेपासून बालाजी मंदिरच्या सभागृहाकडे मोर्चेकरी येत होते. काही वेळातच संख्या वाढत गेली. ठरवून दिलेल्या पार्किंगस्थळी वाहने लावण्यात येत होती. तर मोर्चेकऱ्यांना रिबीन टोपी आणि फलकांचे वाटप करण्यात आले. बालाजी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर अनारक्षित संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर उपस्थित होते. प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचे वाचन सिद्धी सीताराम बांगड हिने केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
या मागण्यांसाठी निघाला मोर्चा
कोणत्याही प्रकारचे आरक्षण ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असावे. उर्वरित सर्व जागा पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर घ्याव्यात. सरकारकडून एका कमिटीच्या आधारे जातीआधारित आरक्षणाचे अवलोकन करण्यात यावे. क्रि मीलेअरच्या योग्य उत्पन्नाचे सर्वेक्षण करावे. कोणत्याही आरक्षित वर्गाच्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गाची जागा मिळू नये यासाठी तरतूद करावी. चुकीच्या पद्धतीने जाती किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र घेणाºया उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायदा करण्यात यावा. दर पाच वर्षांनी आरक्षणाचे परिक्षण व आढावा घ्यावा. आरक्षणाचा लाभ एकच व्यक्ती अथवा कुटुंबाला वारंवार मिळू नये यासाठी उपाययोजना केल्यास आरक्षणाचा लाभ सर्वांना मिळेल अशी व्यवस्था करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.