बंधारा कामाच्या चौकशीसाठी वृद्ध शेतकऱ्याचे उपोषण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:15 AM2021-01-24T04:15:51+5:302021-01-24T04:15:51+5:30
धारूर : येथील मृद व जलसंधारण उपविभागाने मुंगी येथील गुणवती नदीवर उभारलेल्या दोन्ही सिमेंट बंधाऱ्यांचे काम निकृष्ट ...
धारूर : येथील मृद व जलसंधारण उपविभागाने मुंगी येथील गुणवती नदीवर उभारलेल्या दोन्ही सिमेंट बंधाऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या बंधाऱ्यांच्या खाली असलेल्या शेतातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. या कामाची चौकशी करून तत्काळ हे काम चांगल्या दर्जाचे करून घ्यावे, या मागणीसाठी वृद्ध शेतकरी रामराव सलगर यांनी येथील मृद व जलसंधारण उपविभाग कार्यालयासमोर २१ जानेवारीपासून उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील मुंगी येथील गुणवती नदीवर मृद व जलसंधारण उपविभागामार्फत उभारलेल्या दोन्ही सिमेंट बंधाऱ्यांचे काम हे सुरू झाल्यापासून बोगस झालेले आहे. काळ्या मातीचा वापर, कमी जाडीचा गज, सिमेंट कमी व खडी जास्त वापरून काम केल्याने बंधाऱ्याच्या बाजूने असलेल्या जमिनीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. थेंबभरही पाणी या तलावात थांबत नसल्यामुळे चौकशी करून हे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी वारंवार केली. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी गुत्तेदाराला पाठीशी घातल्याने या बंधाऱ्याखाली शेती असलेले वयोवृद्ध शेतकरी सलगर यांनी २१ जानेवारीपासून उपोषण सुरू केले. दोन दिवस होऊनही एकही अधिकारी या उपोषणाकडे फिरकला नव्हता.