मृत्युनंतर वृद्धाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'; अंत्यविधीत उपस्थित १५० ग्रामस्थांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 07:15 PM2020-08-27T19:15:57+5:302020-08-27T19:21:46+5:30
आरोग्य पथकाने वृध्द रुग्णासह परिवारातील काही सदस्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवला होता.
धारुर : तालुक्यातील गांवदरा येथिल एका वृद्धाचा मृत्यू बुधवारी रात्री झाला होता. गुरुवारी सकाळी या वृद्धावर गावंदरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सदर वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यांच्या अंत्यविधीस १०० ते १५० गांवकरी उपस्थित होते. यामुळे गावंदरा गावात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की धारुर तालुक्यातील गावंदरा येथील 62 वर्षीय वृद्धाला बुधवारी दुपारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे धारुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी संशयावरून धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. आरोग्य पथकाने वृध्द रुग्णासह परिवारातील काही सदस्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवला होता. तोपर्यंत रुग्णास घरी विलगीकरण करण्यात आले.
दरम्यान, रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. वृद्धावर गुरुवारी सकाळी गावंदरा येथे हे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मृताच्या अंत्यविधीस शंभर ते दिडशे ग्रामस्थ उपस्थित असल्याने एकच खळबळ उडाली आहे.